कोरोना व्हायरस महामारीनंतर अनेकजण विमा पॉलिसीला गांभीर्याने घेऊ लागले आहेत. तरीही अनेकजण असे आहेत, जे विमा पॉलिसीला अनावश्यक खर्च म्हणून टाळतात. मात्र, सध्याच्या काळात वाढता वैद्यकीय खर्च पाहता विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य, जीवन विमाप्रमाणेच वाहन विमा, प्रॉपर्टी विमा देखील काढणे आवश्यक आहे. विमा तुम्हाला आर्थिक संरक्षण तर देतोच, याशिवाय अडचणीच्या काळात तुमच्या खिश्यावर पडणारा भार देखील कमी करतो.
आतापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा विमा काढावा लागत असे. मात्र, लवकरच ऑल –इन-वन विमा उपलब्ध असून, या अंतर्गत एकाच पॉलिसीमध्ये आरोग्य, जीवन, वाहन अशा सर्व विमा पॉलिसींचा समावेश असेल. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात IRDAI लवकरच बीमा विस्तार योजना सुरू करणार आहे. तुमच्यासाठी पारंपारिक विमा पॉलिसी की बीमा विस्तार योग्य ठरेल, याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
इरडाची बिमा विस्तार योजना काय आहे?
इरडा लवकरच देशभरात सिंगल इंश्योरन्स पॉलिसी सुरू करणार आहे. आतापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी विमा पॉलिसी काढावी लागत असे. या पॉलिसींतर्गत नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी देखील प्रतिक्षा करावी लागायची. मात्र, आता बिमा विस्तार योजनेंतर्गत एकाच ऑल–इन-वन विमा पॉलिसीमध्ये आरोग्य, जीवन, वाहन विमा कव्हरचा समावेश केला जाईल.
याशिवाय, बीमा सुगम नावाने एक पोर्टल सुरू केले जाणार आहे. या पोर्टलच्या मदतीने विम्यासंबंधित सर्व कामे एकाच ठिकाणी होतील. तसेच, बीमा वाहक नावाची संकल्पना देखील राबवली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बीमा वाहकाची नेमणूक केली जाईल, जे नागरिकांना विमा पॉलिसी खरेदी करण्यास मदत करतील.
नियमित विमा vs बिमा विस्तार: तुमच्यासाठी कोणती पॉलिसी योग्य?
एकाच ठिकाणी सर्व सुविधा | अद्याप बिमा विस्तार योजना सुरू झालेली नाही. मात्र, पुढील काही महिन्यात ही योजना सुरू झाल्यानंतर सर्व सामान्य नागरिकांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. बिमा विस्तार अंतर्गत जीवन, आरोग्य, मालमत्ता, वाहन अशा सर्व पॉलिसी एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. तर दुसरीकडे पारंपारिक पद्धतीमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा विमा काढवा लागतो. अशात बिमा विस्तार नक्कीच फायदेशीर ठरू शकते. |
खर्च कमी | पारंपारिक पद्धतीच्या विमा पॉलिसीमध्ये दरवर्षाला हजारो रुपये खर्च करावे लागतात. याशिवाय, तुम्ही वाहन, मालमत्ता, आरोग्य अशा वेगवेगळ्या विमा पॉलिसी घेतला असल्यास खिश्यावर अधिकच भार पडतो. त्या तुलनेत बिमा विस्तार योजनेतंर्गत खरेदी केलेल्या पॉलिसीचा प्रीमियम खूपच कमी असेल. ग्रामीण भागातील नागरिकांना विमा पॉलिसीसाठी जास्त खर्च करणे परवडत नाही, त्यामुळे बिमा विस्तार त्यांच्यासाठी वरदान ठरू शकते. |
क्लेम सेटलमेंट | विमा पॉलिसी ही प्रामुख्याने नुकसान भरून काढण्यासाठी काढली जाते. मात्र, अनेकदा क्लेम सेटलमेंट करताना समस्या येते. त्यात प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या पॉलिसी असल्यास ही समस्या अधिकच वाढते. मात्र, बिमा विस्तार अंतर्गत क्लेम सेटलमेंट प्रोसेस खूपच सोपी असेल. यासाठी खास बीमा सुगम नावाने पोर्टल देखील सुरू केले जाणार आहे. या अंतर्गत विम्याशी संबंधित सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. |
तुमची गरज लक्षात घ्या | नियमित विमा पॉलिसीच्या तुलनेत बिमा विस्तार अंतर्गत अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध असल्या तरीही तुमची गरज काय आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. नियमित विमा पॉलिसीमध्ये लवचिकता पाहायला मिळते. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळे कव्हरेज, वेगवेगळ्या विमा पॉलिसी निवडण्याची संधी असते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मालमत्तेच्या प्रकारानुसार विमा पॉलिसीची निवड करू शकता. तुम्हाला जीवन, आरोग्य विमा हा जास्त कालावधीचा, जास्त सुविधा देणारा हवा असेल तर त्याची ही निवड करता येते. मात्र, बिमा विस्तार अंतर्गत एकाच पॉलिसीमध्ये सर्व गोष्टींचा समावेश असल्याने तुम्हाला हव्या असलेल्या सुविधांचा अभाव असू शकतो. थोडक्यात, तुम्ही तुमच्या सोयीनुसार व बजेटनुसार कोणती विमा पॉलिसी घ्यायची हे ठरवू शकता. |