SBI FD Scheme: स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली स्पेशल फिक्सड् डिपॉझिट स्कीम एसबीआय वी केअर (SBI WeCare) आणि अमृत कलश स्पेशल एफडी स्कीम (Amrit Kalash Special FD Scheme) या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी वाढवला आहे.
Table of contents [Show]
एसबीआय वी केअर (SBI WeCare)
एसबीआय वी केअर या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी बँकेने 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ही योजना नव्याने डिपॉझिट करण्यासाठी आणि योजनेची मॅच्युरिटी झाली असेल तर तिचे नुतनीकरण करण्यासाठी उपलब्ध आहे. SBI WeCare या योजनेवर बँकेकडून 7.50 टक्के व्याजदर दिला जात आहे. ही योजना बँकेच्या स्पेशल फिक्सड् डिपॉझिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) योजनेंतर्गत येते. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी 5 वर्षांपासून 10 वर्षे या कालावधीत गुंतवणूक केल्यास त्यावर चांगले व्याजदर दिले जात आहे.
अमृत कलश स्पेशल एफडी स्कीम (Amrit Kalash Special FD Scheme)
एसबीआय बँकेने SBI WeCare या योजनेबरोबरच अमृत कलश स्पेशल फिक्सड् डिपॉझिट योजनेच्या अंतिम तारखेमध्ये वाढ केली आहे. बँकेने यापूर्वी या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 15 फेब्रुवारी ते 31 मार्च, 2023 पर्यंतचा वेळ दिला होता. पण बँकेने 12 एप्रिलला नवीन सूचना प्रसिद्ध करून अमृत कलश योजनेमध्ये 30 जून, 2023 पर्यंत वाढ केली होती. त्यात आता आणखी वाढ केली असून ती 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या योजनांवर मिळणार इतके व्याजदर
अमृत कलश या स्पेशल मुदत ठेवी योजनेवर सर्वसामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना 400 दिवसांसाठी अनुक्रमे 7.10 आणि 7.60 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर SBI WeCare या योजनेवर बँक 7.50 टक्के व्याजदर देत आहे.
एसबीआयच्या मुदत ठेवींचे दर
स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वसामान्य ग्राहकांना 2 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींवर 3 ते 7 टक्के यादरम्यान व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना किमान 3.50 ते 7.50 टक्के या दरम्यान व्याजदर देत आहे.