वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या मृत्यूच्या बातम्या वाचून संबंधित कुटुंबियांची स्मशानघाटावर, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणीच्या प्रसंगात, मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या, तसेच विमा किती महत्त्वाचा आहे, याची माहिती देणाऱ्या एलआयसी पॉलिसी एजंट भारत पारेख या अवलियाची गोष्टच निराळी आहे.
डेथ क्लेम सेटलर भारत पारेख
भारत पारेख (वय 55) हे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) 13 लाख 6 हजार एजंट्सपैकी एक आहेत. पण तरीही एलआयसीच्या इतक्या एजंटमधून त्यांची ओळख विशेष आहे. भारत पारेख यांना नेहमी असं वाटतं की, “भारतात कोणाच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज लागत नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यावर त्या कुटुंबावर काय दु:ख कोसळू शकतं. हे मी माझे वडिल गेले तेव्हा अनुभवलं आहे.” पारेख, हे नागपूरमधील वृत्तपत्रांमधून छापून येणाऱ्या मृत्यूच्या बातम्या वाचून, संबंधित कुटुंबियांना स्मशानघाटावर किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेताता आणि मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी, तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसाठी विमा किती महत्त्वाचा आहे हे पटवून त्यांना विमा पॉलिसी विकतात. लोकांना डेथ क्लेम वेळेवर मिळाला पाहिजे यासाठी पारेख नेहमी खबरदारी घेत असतात.
एखाद्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबावर काय आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यांनी कोणाकडून काही उधारीवर रक्कम घेतली आहे का? त्यांनी विमा काढलाय का? पुढील आयुष्यासाठी काही बचत किंवा गुंतवणूक केली आहे का?, अशी थेट विचारणा करून भारत पारेख त्यांना एलआयसी पॉलिसीच्या माध्यमातून मदत करतात.
Image source - https://bit.ly/3wi64sG
40 हजार पॉलिसी विकल्या
एलआयसीच्या अनेक एजंटपैकी भारत पारेख हे एलआयसीचे स्टार एजंट आहेत. आतापर्यंत त्यांनी 40 हजार पॉलिसी विकल्या असून त्याची किंमत ठरवायची झाले तर पारेख यांनी नागपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सुमारे 32.4 कोटी डॉलर्सच्या पॉलिसी विकल्या आहेत. पारेख यांना एलआयसीच्या पॉलिसीमधून एक तृतीयांश कमिशन मिळतं. ते पॉलिसीसोबत प्रीमियम जमा करण्याची आणि क्लेम सेटल करण्याची सेवा मोफत देतात.
मीट द नंबर वन, बी द नंबर वन
एलआयसी हा असा व्यवसाय आहे. ज्यात बऱ्याचवेळा लोकांकडून नकार स्वीकारावा लागतो. लोक विमा पॉलिसीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. तरीही भारत पारेख हे विमा पॉलिसीतील स्टार मानले जातात. जगभरातील लाईफ इन्श्युरन्स आणि फायनान्शिअल सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी पारेख यांना भाषणासाठी बोलावलं जातं. पारेख यांची या विषयावर अनेक प्रेरणादायी भाषणं असून त्यांनी त्याच्या ऑडिओ कॅसेटही बनवल्या आहेत. या कॅसेटवर ‘मीट द नंबर वन, बी द नंबर वन’ असं लिहिलं आहे.
40 हजार विमाधारकांच्या जीवन-मृत्यूच्या नोंदीचं सिक्रेट
भारत पारेख यांची 35 जणांची टीम असून त्यांच्या व्यवसायातील सर्वांत मोठा भाग हा विमाच आहे. या व्यवसायासाठी त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं असून त्याबाबतचे नवनवीन तंत्रज्ञान ते वेळोवेळी शिकून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्या टीमद्वारे सर्व ग्राहकांना वाढदिवसाच्या, लग्नाच्या किंवा सुखद प्रसंगाच्या शुभेच्छा देण्याचं, भेटवस्तू पाठवण्याचं काम सातत्याने सुरू असतं. विमा हा तसा वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय असूनही पारेख यांनी सुमारे 40 हजार लोकांशी वेगवेगळ्या माध्यातून संवाद सुरू ठेवला आहे. हा संवाद कशाप्रकारे ठेवता, याबाबत त्यांना विचारले, तर त्यांना अधिक न सांगता हे सिक्रेट असल्याचे नमूद केलं.
वयाच्या 18 व्या वर्षापासून विमा विक्री
वडील मिल वर्कर आणि गृहिणी आईच्या पोटी जन्मलेल्या भारत पारेख यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. ते 200 स्केअर फुटांच्या घरात आई-वडिल आणि भावंडांसोबत राहत होते. घरच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी लहाणपणी अगरबत्त्या बॉक्समध्ये पॅक करण्याचं काम करत होते. पारेख जेव्हा 18 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांनी कॉलेज करत असताना विमा विकण्यास सुरूवात केली होती. लोकांना विमा विकणं हे कठीण काम होतं. त्यांच्या या विमा पॉलिसीमुळे लोक त्यांना टाळू लागले. त्यांच्याबद्दल वाईट बोलू लागले. यावर उपाय म्हणून त्यांनी जिवंत माणसांपेक्षा मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना मदत करण्याचा मार्ग निवडला आणि आज त्यांचे रस्त्याकडेला स्टॉल लावणाऱ्यापासून, मोठ्या व्यावसायिकापर्यंत सर्व त्यांचे ग्राहक आहेत.
Image Source - https://bit.ly/38cQzu8