• 28 Nov, 2022 12:54

भारतातील मुलींसाठी 10 सर्वोत्तम गुंतवणूक योजना | Best investment plan for girl child in India

भारतातील मुलींसाठी 10 सर्वोत्तम गुंतवणूक योजना | Best investment plan for girl child in India

भारतात मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीचे शिक्षण आणि करिअरसाठी आवश्यक असलेल्या भविष्यातील खर्च नियोजित करण्यासाठी चांगल्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक (investment schemes) केली पाहिजे.

जर तुम्हाला तुमच्या मुलींचे भविष्य सुनिश्चित करायचे असेल तर तुम्हाला काही स्मार्ट निर्णय घ्यावे लागतील. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी, करिअर किंवा व्यवसायासाठी लागणारा निधी मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे विविध पर्याय वापरून त्यातून अधिकाधिक लाभ मिळवून घ्यायला हवा. असेच गुंतवणुकीचे विविध पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

2022 मध्ये भारतातील मुलींसाठी 10 सर्वोत्तम गुंतवणूक योजना

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण व लग्नासाठी सुकन्या समृध्दी योजना सरकारने सुरू केली. या योजने अंतर्गत 10 वर्षाखालील मुलीचे खाते उघडले जाऊ शकते. कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते. यात किमान 250 रूपयांपासून खाते उघडता येते आणि जास्तीत जास्त 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेंतर्गत गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज दर निश्चित करण्यात आला आहे. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी सुकन्या समृद्धी योजनेतून 50 टक्के रक्कम काढता येते.

चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड

चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड ही एक प्रकारची गुंतवणूक योजना असून यातील पैसे इक्विटी आणि डेब्टमध्ये योजनांमध्ये गुंतवले जातात. याला किमान पाच वर्षांचा मुदतबंद म्हणजेच लॉक-इन पिरियड असतो, त्याआधी पैसे काढता येत नाहीत. मुलगी 18 वर्षे पूर्ण करेपर्यंत पालक हे खाते हाताळू शकतात. दीर्घकालीन मालमत्ता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या गुंतवणुकीत एक प्रकारची शिस्त आणण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

पोस्टाच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेद्वारे 10 वर्षांवरील अल्पवयीन मुलीचेही खाते उघडता येते. या योजनेचा कालावधील 5 वर्षांचा असून सध्या यावर 6.8 टक्के व्याज मिळते. हे व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. 1 हजार रूपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांच्या कालावधीनंतर 1389.49 रूपये मिळतील. या योजनेतील गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतही मिळते.

पोस्ट-ऑफिस मुदत ठेव (POTD)

पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना या बँकेच्या एफडी सारख्याच असतात. 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवी ठेवल्या जातात. बँकेच्या एफडीप्रमाणेच पोस्टाच्या ठेवींवर गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळू शकतो. 5 वर्षांच्या मुदत ठेव खात्यासाठी पोस्ट ऑफिस 6.7 टक्के व्याजदर देते. या योजनेंतर्गत देशात कोठेही खाते हस्तांतरित करता येते. यासाठी किमान 1 हजार रूपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.

युनिट लिंक्ड विमा योजना (ULIP)

युनिट लिंक्ड विमा योजना ही विमा पॉलिसी आणि मार्केट लिंक्ड गुंतवणूक योजना अशी दोन उद्देश साध्य करणारी योजना आहे. या पॉलिसीअंतर्गत प्रीमियमचा काही भाग इक्विटी किंवा डेब्ट फंडात गुंतवला जातो. याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो.

पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP)

पद्धतशीर गुंतवणूक योजना म्हणजे सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन ( Systematic Investment Plan ). एसआयपी ही गुंतवणुकीची अशी पद्धत आहे; ज्याद्वारे गुंतवणुकदार सतत गुंतवणूक करू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा हा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदार कमीतकमी रक्कम सातत्याने गुंतवू शकतो. म्हणजेच यामध्ये 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करता येऊ शकते.

पोस्ट-ऑफिस आवर्ती ठेव (Recurring Deposit)

पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत (आरडी) एका महिन्यात किमान 100 रुपये गुंतवावे लागतात. 10 वर्षांवरील अल्पवयीनही या योजनेत स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतो. यावर सध्या 5.8 टक्के वार्षिक व्याजदर आहे. 3 महिन्यांच्या कालावधीने चक्रवाढ व्याज दिले जाते. या योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. हा कालावधी अर्ज करून पुढील 5 वर्षांसाठी वाढवता येतो.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) ही भारतातील सरकारी बचत योजना आहे. कर बचतीसाठी तसेच दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी या योजनेद्वारे मोठा निधी जमवता येतो. याची मुदत 15 वर्षे असते. यात एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख तर किमान 500 रूपये गुंतवता येतात. यावर वार्षिक 6.4 टक्के व्याजदर दिलं जातं.

गोल्ड ईटीएफ (Gold ETF)

प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी गोल्ड फंडमध्ये पैसे गुंतवता येऊ शकतात. ही म्युच्युअल फंडाची योजना आहे. यामध्ये सोन्याची युनीटमध्ये खरेदी केली जाते. ते विकल्यावर सोने मिळत नाही. पण त्यावेळच्या बाजारमूल्याएवढी रक्कम मिळते. सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वात स्वस्त पर्याय मानला जातो.

मुदत ठेव (FD)

ज्यांना पैशांबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही अशा गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवी हा एक चांगला पर्याय आहे. कोणतीही बँक किंवा नॉन बॅंकिंग वित्तीय कंपनी मुदत ठेवीचे खाते उघडण्याची सुविधा देतात. संपत्तीत वाढीपेक्षा स्थिर, सुरक्षित आणि निश्चित परताव्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो.

तुम्ही जर तुमच्या मुलीचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करू इच्छित असाल तर वर दिलेल्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करा.