Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Child Investment Plans: मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी? वाचा

Child Investment Plans

Image Source : https://www.freepik.com/

मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे हे सर्वात अवघड काम आहे. शेकडो बचत योजनांपैकी गुंतवणुकीसाठी नेमकी कोणत्या योजनेची निवड करणे महत्त्वाचे असते.

मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी पालकांकडून विविध योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र, मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे हे सर्वात अवघड काम आहे. शेकडो बचत योजनांपैकी गुंतवणुकीसाठी नेमकी कोणत्या योजनेची निवड करणे महत्त्वाचे असते. 

मुलांसाठी शैक्षणिक, आरोग्य योजनांमध्ये गुंतवणूक करणे सर्वात फायद्याचे ठरते. याशिवाय, सोने, मुदत ठेव, म्युच्युअल फंड अशा सुरक्षित माध्यमांमध्येही गुंतवणूक करणे चांगले आहे. तुम्ही देखील मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी काही चांगल्या योजनांबद्दल जाणून घ्या.

सरकारी गुंतवणूक योजना 

सरकारद्वारे मुलांसाठी विविध गुंतवणूक योजना राबवल्या जातात. यापैकी सुकन्या समृद्धि योजना सर्वात लोकप्रिय आहे. प्रामुख्याने मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी या योजनेत गुंतवणूक करता येते. योजनेत कमीत कमी 250 रुपये ते वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवणूक करता येते. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर जवळपास 7.6 टक्के व्याजदरासह संपूर्ण रक्कम परत मिळते. याशिवाय तुम्ही पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्येही गुंतवणूक करू शकता.

शैक्षणिक गुंतवणूक योजना

मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड पैसा खर्च होतो. त्यामुळे मुलांना भविष्यात उच्च शिक्षणासाठी कोणतीही समस्या येऊ नये, त्यांना शिक्षणासाठी परदेशात जाता यावे, यासाठी तुम्ही शैक्षणिक संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. ICICI Pru Smart Kid’s Regular Premium, LIC New Children’s Money Back Plan, SBI Life Smart Champ Insurance Plan, Sahara Ankur Child Plan, SBI Life Smart Scholar अशा योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. काही योजनांमध्ये मुलांच्या जन्मापासूनच गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. तुम्ही जेवढी रक्कम गुंतवाल, तेवढ्या प्रमाणात मॅच्युरिटीनंतर परतावा मिळेल.  

विमा योजना 

मुलांच्या भविष्यासाठी विमा योजनांमध्ये गुंतवणुकीलाही प्राधान्य देऊ शकता. विमा योजनांमुळे वैद्यकीय खर्चासह मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक असा दुहेरी फायदा होतो. Aegon Life Rising Star Child Insurance Plan, Ageas Federal Child Insurance Savings Plan, Canara HSBC Child Plan, Exide Life Wealth Maxima Plan, HDFC SL Youngstar Super Premium या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. काही योजनांमध्ये गरजेनुसार रक्कम काढण्याची सुविधाही मिळते. या योजनांद्वारे मुलांना आर्थिक सुरक्षा प्राप्त होईल. 

म्युच्युअल फंड 

मुलांच्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी म्युच्युअल फंड हा देखील एक चांगला पर्याय आहे. तुम्ही एसआयपी किंवा एकरकमी स्वरुपात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडांमध्ये मुलांसाठी विशिष्ट योजना असतात. इक्विटी आणि डेटसह येणारे हायब्रिड प्लॅन्स उपलब्ध आहेत. परतावा व जोखीम लक्षात घेऊन अशा योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.

इतर गुंतवणूक 

या योजनांसह गुंतवणुकीच्या विविध माध्यमांचाही विचार करायला हवा. तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करून सोने, मुदत ठेव, आवर्ती ठेवीमध्ये गुंतवणूक करू शकता. यात केलेल्या गुंतवणुकीचा गरजेनुसार वापरही करता येईल.