पैसा प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. स्वतःचा व्यवसाय असो अथवा नोकरी करत असाल किंवा महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत असाल, पैसा हा महत्त्वाचा असतोच. त्यामुळे अनावश्यक गोष्टींसाठी पैसा खर्च करणे टाळायला हवे. तसेच, योग्य आर्थिक शिस्त लावणे देखील गरजेचे आहे. सध्या स्मार्टफोनच्या एका क्लिकवर सहज हजारो रुपयांचा व्यवहार मिनिटात करता येतो. परंतु, याच स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही पैशांची बचत व योग्य नियोजन करू शकता. अनेक असे Automatic Savings Apps आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही पैशांची बचत करू शकता.
मनी सेव्हिंग अॅप्स वापरण्याचे हे आहेत फायदे
आर्थिक उद्देश साधण्यासाठी मदत | तुम्ही जर दरमहिन्याला अनावश्यक खर्च करत असाल तर मनी सेव्हिंग अॅप्स तुमच्यासाठी खूपच फायद्याचे ठरू शकतात. या अॅप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे आर्थिक लक्ष्य सहज साध्य करू शकता. समजा, तुम्हाला दरमहिन्याला तुमच्या पगारातील 10 हजार रुपयांची बचत करायची आहे. अशावेळी हे अॅप्स तुमच्या खूपच उपयोगी येतील. |
इमर्जेंसी फंड | भविष्यात कोणती आर्थिक समस्या निर्माण होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. अचानक समस्या आल्यावर पैसे नसल्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे आतापासूनच योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. मनी सेव्हिंग अॅप्स हे तुम्हाला आर्थिक शिस्त लावण्यासोबतच तुमच्या बँक खात्यातील रक्कम इमर्जेंसी फंडमध्ये जमा करण्यास देखील मदत करतात. |
शिस्त आणि सातत्य | आपण दरमहिन्याच्या पगाराला ठराविक रक्कम बाजूला काढण्याचा निर्धार करतो, परंतु एकदाही हे शक्य होत नाही. बचतीसाठी बाजूला काढून ठेवलेली रक्कम देखील आपण खर्च करतो. त्यामुळे Automatic Savings Apps चा वापर केल्यास ठराविक कालावधीनंतर सातत्याने पैशांची बचत करण्यास मदत मिळते. |
अनावश्यक खर्च टाळण्यास मदत | मनी सेव्हिंग अॅप्स हे वेगवेगळ्या फीचर्ससह येतात. यातील सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे खर्चाची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळते. अॅप्समुळे जास्त पैसे कोणत्या गोष्टींसाठी खर्च होत आहेत, याची माहिती सहज उपलब्ध होते. याद्वारे अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होईल. |
लोकप्रिय मनी सेव्हिंग अॅप्स
Wizely | या मनी सेव्हिंग अॅपला तुम्ही प्ले स्टोरवरून मोफत डाउनलोड करू शकता. हे अॅपद्वारे तुम्ही अवघ्या 10 रुपयांपासून बचत करू शकता. विशेष म्हणजे या अॅपद्वारे पैशांची बचत करतानाच रिवॉर्ड्स देखील मिळतात. तुम्हाला पैशांची बचत कशी करायची, कशात गुंतवणूक करायची याबाबत देखील हे अॅप माहिती देते. |
Digit | ईएमआय भरायचा असेल अथवा पैशांची बचत करायची असेल, डिजिट अॅप तुमच्यासाठी सर्व कामे सहज करू शकते. तुमचे बँक खाते अॅपशी कनेक्ट केल्यानंतर यातील रक्कम खर्चानुसार वेगवेगळ्या गटात विभागली जाते. यामुळे ठराविक रक्कम बचत करण्यास मदत मिळते. |
Mint | मिंट देखील लोकप्रिय मनी सेव्हिंग अॅप आहे. या अॅपशी तुमचे बँक खाते, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड लिंक करून खर्चाची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळवू शकता. अॅप तुम्ही केलेल्या खर्चाची माहिती ग्राफच्या माध्यमातून दाखवते. तसेच, खर्चाच्या स्वरुपानुसार तुमच्यासाठी बजेट देखील तयार करते. |