Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Instant Loan Apps : अॅपवरून लोन अप्लाय करताय? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

Instant Loan Apps : अॅपवरून लोन अप्लाय करताय? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

Instant Loan Apps : इन्स्टंट लोन अॅपवरून जर तुम्ही कर्ज घेत असाल तर सावध व्हा. फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमुळे अशाप्रकारचे अॅप्स वादात सापडलेत. तर अशा बेकायदा अॅपवरून लोन घेतल्यानंतर आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे कर्ज काढण्याची कितीही गरज असली तरी थोडं थांबणं हाच यातला मार्ग आहे.

ऑनलाइन कर्ज देणारे अॅप्स कोणासाठीही मोठी अडचण आणि डोकेदुखी निर्माण करू शकतात. रिझर्व्ह बँकेनं (Reserve bank of India) मागच्या काही काळापासून अनेक अॅप्सवर बंदी घातलीय. तर गुगल प्ले स्टोअवरही बदल झाले आहेत. याठिकाणी कर्ज देणाऱ्या अॅप्ससाठी प्ले स्टोअरनं आपलं धोरणच बदललं आहे. ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक (Fraud) करण्याची या अॅप्सची कार्यपद्धती असल्याचं समोर आलं. अनेक प्रकरणांमध्ये तर ग्राहकांच्या वैयक्तिक डेटाचा गैरवापरदेखील दिसून आलाय. अशा परिस्थितीमध्ये इन्स्टंट लोन अॅपसाठी अर्ज करत असताना संशयास्पद अॅप्सच्या फंदात पडू नये.

कर्ज हवंय? काय कराल?

अनेकवेळा आपल्याला पैशांची गरज असते. मात्र अचानक अशी मोठी रक्कम आणायची कुठून, हा आपल्यासमोरचा प्रश्न असतो. काय करावं, हे समजत नसतं. बँकही ऐन वेळी कर्ज देण्यास तयार होत नाही. अनेक अटी असतात. त्या पूर्ण केल्यानंतरच कर्ज उपलब्ध होतं. ही प्रक्रियाही वेळ घेणारी असते. या सर्व गैरसोयीत आपल्याला शॉर्टकट पर्याय दिसतो तो या इन्स्टंट लोन अॅपचा. आपली गरज ओळखून मग हे अॅप्सदेखील पद्धतशीरपणे आपल्याला आमिषं दाखवून जाळ्यात ओढतात आणि आपली फसवणूक करतात. त्यानंतर जो मानसिक त्रास होतो, त्यामुळे पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे काहीही उरत नाही. सायबर दोस्तनंही याबाबत सावध केलंय. तर अशा परिस्थितीत नेमकं काय केलं पाहिजे? काही सोप्या टिप्स पाहुया...

वैयक्तिक डेटा प्रवेश नको

अॅपवर साइन अप केल्यानंतर ते अॅप अॅक्टिव्हेट होण्यापूर्वी काही परमिशन मागतं. त्यात वैयक्तिक डेटाचीही परवानगी विचारली जाते. तर ही माहिती देणं बंधनकारक केलं जातं. मात्र यामुळे तुमचा डेटा असुरक्षित हाती जातो. म्हणजेच तो चोरीला जातो. त्यामुळे वैयक्तिक कोणत्याही माहितीला परवानगी देऊ नये.

गुगलनं बदललं धोरण 

ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा अशाप्रकारच्या अॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याच्या तक्रारीनंतर आता गुगलनंही आपल्या धोरणांमध्ये बदल केला. आपल्या डेव्हलपर पॉलिसीमध्ये हा बदल करण्यात आलाय. नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली आहेत. या अंतर्गत वैयक्तिक कर्ज अॅप्सवर फोन अॅक्सेस लिमिटेड करण्यात आलाय. आता हे अॅप्स तुमच्या फोनचं एक्सटर्नल स्टोरेज, मीडिया इमेज, व्हिडिओ, लोकेशन, कॉन्टॅक्ट्स, फोन नंबर, कॉल लॉग इत्यादींचा प्रवेश घेऊ शकणार नाहील. आता ऑनलाइन कर्ज देणार्‍या अॅप्सना गुगलसोबत आरबीआय कर्ज परवाना शेअर करावा लागेल, अस गुगलनं आपल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलंय. तसंच नोंदणीकृत बँक/NBFCची माहिती अॅपच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्यावी लागणार आहे. फक्त अॅप हेच कर्ज देणारं प्लॅटफॉर्म असल्यास तशी माहिती अॅपच्या डिस्क्रिप्शनमध्ये असायला हवी. त्यासोबतच जर हे फक्त एक एक्सचेंज प्लॅटफॉर्म असेल आणि ग्राहक इतर प्लॅटफॉर्मवरून कर्ज घेणार असेल तर त्याबद्दलदेखील स्पष्ट उल्लेख असायला हवा.

अॅप नोंदणीकृत असणं आवश्यक

अशा लोन अॅप्सना आरबीआयकडून परवानगी घेणं आवश्यक आहे. जर अशाप्रकारे नोंदणी नसेल तर कर्ज घेऊन तुम्ही इथे अडकू शकता.

निकड पाहावी

तुम्हाला खरंच पैशांची गरज आहे का, किती पैसे लागणार आहेत, व्याज कसं असणार आहे, या सर्वांचा विचार कर्ज घेताना करावा लागेल. कारण असे अॅप्स खूप जास्त व्याजानं कर्ज देतात. त्यामुळे कर्ज काढून पुन्हा भला मोठा व्याजदर असल्यानं पुन्हा कर्जाचा बोजा तुमच्यावर पडू शकतो.