Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Modified Car Insurance: गाडी मॉडिफाय करत असाल तर सावधान! कार विमा पडेल महागात!

Modified Car Insurance

कार विम्यासाठी अर्ज करताना, तुमच्या वाहनात तुम्ही केलेले कुठलेही बदल स्पष्टपणे विमा प्रतिनिधीला सांगणे गरजेचे आहे. या मॉडिफिकेशनची माहिती विमा कंपन्यांकडे नसेल तर तुमचा विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो किंवा तुमची विमा पॉलिसी रद्द केली जाऊ शकते.

अनेक तरुणांना आपली गाडी मॉडिफाय करायची आवड असते. गाडी मग ती चारचाकी असू द्या किंवा दुचाकी असू द्या, त्यात अंतर्गत आणि बाह्य बदल करून गाडीचा चेहरामोहरा बदलण्याची हौस तरुणाईला असते. तसेच नवीन गाडी घेणे जेव्हा खिशाला परवडत नसते, तेव्हा जुनी गाडी खरेदी करून त्यात बदल केले जातात. गाडी मॉडिफाय केल्यानंतर ती दिसते छानच, परंतु हीच मॉडिफाय केलेल्या गाडीचा विमा काढायला तुम्ही जाल तेव्हा तुम्हांला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊयात मॉडिफाय केलेल्या गाडीचा विमा काढताना काय अडचणी येऊ शकतात.

विम्याचे प्रीमियम वाढू शकतात

उत्पादक कंपनीला गाडीच्या चालकाचा प्राधान्याने विचार करावा लागतो. जेव्हा केव्हा कुठली कार किंवा बाईक डिजाईन केली जाते, तेव्हा सुरक्षिततेचे सर्व नियम त्यात तपासले जातात. परंतु जेव्हा कार किंवा बाईक मॉडिफाय केली जाते तेव्हा त्या वाहनाच्या मूळ संरचनेत/ डिझाईनमध्ये बदल केले जातात. त्यामुळे वाहनाचे अपघात आणि वाहनाचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. वाहनाच्या कार्यक्षमतेवर देखील याचा परिणाम होतो. जिथे अशा शक्यता वाढतात तिथे साहजिकच विमा कंपन्या प्रीमियम देखील वाढवतात.

त्यामुळे गाडी मॉडिफाय करत असाल किंवा आधीच मॉडिफाय केलेली गाडी खरेदी करत असाल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आणि अत्यावश्यक आहे हे वारू नका.

वाहन विमा प्रतिनिधी शरद कदम यांच्याशी याबाबत विचारणा केली असता, त्यांनी काही गोष्टींची विस्तृत माहिती दिली. वाहन मॉडिफाय केल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टींचा विमा कंपनी विचार करते याबाबत बोलताना त्यांनी काही मुद्दे सांगितले, हे मुद्दे खालीलप्रमाणे:

वाहन चोरीचा धोका वाढतो ( Increased Risk of Theft): कारमध्ये जेव्हा तुम्ही विशेष असे बदल करता तेव्हा ती अधिक आकर्षक बनते. परंतु आकर्षक कार चोरी जाण्याची शक्यता देखील अधिक असते. त्यामुळे विमा कंपन्या चोरीच्या वाढत्या जोखमीसाठी आणि कार संबंधित काही वस्तू किंवा समान चोरीला गेल्यास त्याचा खर्च भरून काढण्यासाठी जास्त प्रीमियम आकारू शकतात.

कार्यक्षमतेत बदल (Changes to Performance): जेव्हा कार अधिक सुंदर आणि आकर्षक बनावी म्हणून तुम्ही गाडीचे चाक मॉडिफाय करता, दरवाजे बदलता तेव्हा गाडीचा वेग आणि कार्यक्षमता यांत देखील बदल होतो.असे बदल केल्याने अपघात आणि वाहनाचे नुकसान होण्याचा धोका वाढू शकतो. विमा कंपन्या या मॉडिफिकेशनला उच्च जोखीम म्हणून बघतात आणि विमा दाव्याची अधिक संभावना लक्षात घेता वाढीव प्रीमियम आकारू शकतात.

शरीर किंवा संरचनेत बदल (Changes to the Body or Structure): कारच्या संरचनेत बदल करणारे बदल, जसे की स्पॉयलर जोडणे किंवा कमी करणे, कारच्या स्थिरतेवर (Stability) परिणाम करू शकतात. यामुळे अपघात आणि वाहनाचे नुकसान होण्याचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे जास्त विमा प्रीमियम आकारला जाऊ शकतो.

इंजिनमध्ये बदल (Changes to the Engine): इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी,म्हणजेच हॉर्सपॉवर किंवा टॉर्क वाढवण्यासाठी इंजिनमध्ये बदल केल्याने अपघात आणि वाहनाचे नुकसान होण्याचा धोका देखील वाढू शकतो. विमा कंपन्या यामुळे जास्त प्रीमियम आकारू शकतात.

कार विम्यासाठी अर्ज करताना, तुमच्या वाहनात तुम्ही केलेले कुठलेही बदल स्पष्टपणे विमा प्रतिनिधीला सांगणे गरजेचे आहे. या मॉडिफिकेशनची माहिती विमा कंपन्यांकडे नसेल तर तुमचा विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो किंवा तुमची विमा पॉलिसी रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे तुमची गाडी किंवा बाईक मॉडिफाय करण्यापूर्वी या सगळ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.