बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणेस्थित मुख्यालय असलेल्या बँकेनंदेखील आपल्या नफ्यात विक्रमी अशी वाढ नोंदवलीय. एक वर्षाचा कालावधी पाहता मागच्या वर्षभरात बँकेचा नफा सुमारे 126 टक्क्यांनी वाढून 2,602 कोटी रुपये झालाय. दुसरीकडे, मूल्याच्या बाबत सर्वात जास्त वाढ मात्र एसबीआयची झाल्याचं दिसून आलंय.
Table of contents [Show]
नफ्यात 57 टक्के वाढ
बँकांनी केलेल्या कामगिरीसंबंधीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या नफ्यात वाढ झालीय. सार्वजनिक क्षेत्रात सध्या एकूण 12 बँका आहेत. या 12 बँकांचा निव्वळ नफा 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 57 टक्क्यांनी वाढून 1,04,649 कोटी रुपयांवर पोहोचलाय. बँक ऑफ महाराष्ट्रचं एकूण कर्ज किंवा आगाऊ रक्कम गेल्या आर्थिक वर्षात 29.4 टक्क्यांनी वाढून 1,75,120 कोटी रुपये झालीय. इतर बँकांच्या कामगिरीतही सुधारणा झालीय. इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँकेच्या कर्जात 21.2 टक्के आणि 20.6 टक्के वाढ झाली.
मूल्यामध्ये एसबीआय अव्वल
मूल्याच्या विषयामध्ये देशातली सर्वात मोठी कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडियाचं एकूण कर्ज 27,76,802 कोटी रुपयांच्या बीओएमपेक्षा जवळपास 16 पट जास्त आहे. ठेवींच्या बाबतीत, बँक ऑफ महाराष्ट्रच्या ठेवी गेल्या आर्थिक वर्षात 15.7 टक्क्यांनी वाढून 2,34,083 कोटी रुपये झाल्या आहेत. बँक ऑफ बडोदा 13 टक्के (10,47,375 कोटी रुपये) वाढीसह ठेवींच्या वाढीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे, तर पंजाब नॅशनल बँक (PNB) 11.26 टक्क्यांनी वाढीसह 12,51,708 कोटी रुपये झाली आहे.
सीएएसएमध्ये (CASA) बँक ऑफ महाराष्ट्र पुढे
बँक ऑफ महाराष्ट्र कमी किंमतीत चालू खातं आणि बचत खातं (CASA) 53.38 टक्के ठेवी सुरक्षित करण्यात अव्वल स्थानावर आलं आहे. त्यानंतर 50.18 टक्क्यांसह सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा क्रमांक लागतो. 2022-23मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा एकूण व्यवसाय 21.2 टक्क्यांनी वाढून 4,09,202 कोटी रुपयांवर पोहोचलाय. बँक ऑफ बडोदा दुसऱ्या स्थानावर आहे. तिची उलाढाल 14.3 टक्क्यांनी वाढून 18,42,935 कोटी रुपये झालीय.
चौथ्या तिमाहीची स्थिती काय?
चौथ्या तिमाहीचा विचार करता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी उत्कृष्ट कमाई केलीय. स्टेट बँक ऑफ इंडियानं सलग तिसऱ्या तिमाहीत सर्वकालीन उच्च निव्वळ नफा कमावलाय. तर बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यासारख्या इतर प्रमुख पीएसयू बँकांनीही त्यांच्या कामगिरीत सुधारणा केलीय. एसबीआयचा निव्वळ नफा आणि निव्वळ व्याज उत्पन्न हे बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेच्या मिळून दुप्पट असल्याचं दिसतंय. निव्वळ व्याज मार्जिनदेखील (NIM) चांगलं आहे. मात्र प्रोव्हिजन कव्हरेज रेशो (PCR) इतर दोन बँकांपेक्षा किंचित कमी आहे.
सर्वच बँकांची कामगिरी उत्कृष्ट
एकूणच सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी विविध स्तरावर आपली कामगिरी उत्कृष्टपणे बजावलीय. बहुतांशी बँकांनी आपल्या नफ्यात घसघशीत वाढ नोंदवलीय. नफा, कर्ज, चालू खातं, बचत खातं अशा मुद्द्यांवर बँक ऑफ महाराष्ट्रनं चांगली कामगिरी केली. मुल्याच्या बाबत एसबीआय सर्वात पुढे आहे. ठेवींच्या बाबत बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँकांनीही उत्कृष्ट कामगिरी बजावलीय.