केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात देशभरातील विविध कामगार संघटनांनी 28 आणि 29 मार्च रोजी संप पुकारला आहे. या देशव्यापी संपात बॅंक, विमा क्षेत्रातील कर्मचारी संघटना, अधिकारी संघटना, उद्योग जगतातील कामगार संघटना आणि असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगार असे सुमारे 9 कोटींहून अधिक कामगार या संपात सहभागी होणार आहेत.
बॅंकिंग क्षेत्रातील एआयबीईए (ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन), एआयबीओए (ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन) आणि बेफी (बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया) या तीन संघटनांचे एकून अंदाजित 5 लाखांहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी होणार आहेत. या संघटना बँकांच्या खासगीकरणाला विरोध करत या आंदोलनात आपला सहभाग नोंदवणार आहेत. स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक वगळता इतर सर्व बँकांचे कामकाज पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपात ग्रामीण बँक तसेच सहकारी बँकेतील कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत.
या देशव्यापी संपामुळे ऐन 31 मार्चपूर्वी बॅंका, रेल्वे, माल वाहतूक संघटना, वीज कंपन्या आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यांचे खासगीकरण करू पाहत आहे. त्याचा विरोध दर्शवण्यासाठी तसेच सरकार सार्वजनिक व खाजगी उद्योग क्षेत्रातील जागांवर नवीन भरती न करता ते सरसकट आऊटसोर्सिंग आणि कंत्राटी पद्धतीचा अवलंब करत असल्याने, त्याच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचबरोबर नवीन कामगारांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशीही या कामगार संघटनांची मागणी आहे.