Dating app Fraud: डेटिंग अॅपवर अनेक तरुण तरुणी रेंगाळताना दिसतात. जेन झी (Gen Z) म्हणजेच 2000 च्या शतकात जन्मलेले 90% तरुणांचे या डेटिंग साईटवर खाते आहे. तसेच तिशी चाळिशीत असलेल्या व्यक्तीही डेटिंग अॅप वापरण्यात मागे नाहीत. वृत्तपत्रात डेटिंग अॅपद्वारे फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या येतात. मात्र, अद्यापही जनतेत जनजागृती नाही. नुकतेच बंगळुरुतील एका महिलेला साडेचार लाखांना गंडा घालण्यात आला.
लंडनमध्ये डॉक्टर असल्याचे भासवले
ऑनलाइन डेटिंग अॅप टिंडरवरुन ओळख झाल्यानंतर महिलेला साडेचार लाख रुपये गमवावे लागले. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. फसवणूक झालेली महिला खासगी कंपनीत काम करते. तिची टिंडरवरुन अद्विक चोप्रा नामक व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने तो मूळचा मुंबईतील असून लंडनमध्ये डॉक्टर असल्याचे सांगितले. मात्र, ही सर्व माहिती खोटी होती.
चॅटिंगनंतर काही दिवसांतच या तोतया व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन केला. तसेच तिला बंगळुरूला भेटायला येण्याचे वचन दिले. त्याची टिंडर प्रोफाइल आणि व्यवस्थित बोलत असल्याने महिलेला ही व्यक्ती खरे बोलत असल्याचा विश्वास पटला. लंडनवरून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत असल्याचे त्याने महिलेला सांगितले.
एअरपोर्टवर शुल्क भरण्यासाठी मागितले पैसे
मात्र, त्या दिवशी महिलेला एअरपोर्ट व्यवस्थापनाच्या नावे बनावट कॉल आला. विमानतळावर प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क भरावयास सांगितले. परदेशातून आल्यामुळे लगेच त्याच्याकडे पैसे नसावेत तसेच एअरपोर्टवर अडचणींचा सामना करायला लागू नये म्हणून या महिलेने साडेचार लाख रुपये पाठवले. मात्र, थोड्या वेळाने पुन्हा 6 लाख रुपये जीएसीटी भरण्यासाठी पैसे पाहिजेत असा फोन आला. तेव्हा महिलेला संशय आल्याने पोलिसांत तक्रार दिली.
या तोतया व्यक्तीने टिंडर प्रोफाइल तत्काळ डिलिट केली. तसेच मोबाइल नंबरही स्वीच ऑफ केला. पैसे मागणाऱ्या इतर व्यक्तींनी ज्या नंबरवरुन फोन केला होता ते नंबर स्वीच ऑफ करण्यात आले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ऑनलाइन साइटवरुन ओळख झालेल्या अज्ञान व्यक्ती महिलांची फसवणूक करत असल्याच्या अनेक घटना या आधीही झाल्या आहेत.
डेटिंग अॅपवरुन फसवणूक टाळण्यासाठी काय करावे?
अज्ञान व्यक्तीच्या प्रोफाइलवर लगेच विश्वास ठेवू नये.
अशा व्यक्तींसोबत कोणताही पैशांचा व्यवहार करू नये किंवा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ शेअर करू नये.
बऱ्याच वेळा समोरची व्यक्ती अडचणीत असल्याचे भासवते. जसे की, विमानतळावर अडकून पडलो आहे, कुटुंबात कोणीतरी आजारी आहे, विमान तिकीट, जीएसटी शुल्क भरण्यासाठी पैसे हवेत, असे कारण सांगते.
डेटिंग साईटवर ओळख झाल्यानंतर तोतया व्यक्ती वैयक्तिक मेल आयडी- व्हॉट्सअॅप क्रमांक मागतात. मात्र, अशी संवेदनशील माहिती शेअर करू नका.
डेटिंग साइटवरील तोतया व्यक्ती कायम भेटण्याचे वचन देतात. मात्र, एखाद्या एमर्जन्सीमुळे येता येणार नाही, असे सांगतात. हा फसवणूकीचा प्रकार असू शकतो हे लक्षात ठेवा.
एखाद्या व्यक्तीन डेटिंग साईटवर दिलेली माहिती इतर ऑनलाइन साइटवरुन पडताळून घ्या.
बरेच घोटाळेबाज डेटिंग साइटवर स्वत:चे फोटो वापरत नाहीत. इंटरनेटवरील रँडम फोटो प्रोफाइलला ठेवतात. हे सर्व फोटो पाहून तुम्ही गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च करुन कोणाचे आहेत ते पाहू शकता.
फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिसांत किंवा सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल करा.