सुरक्षित आणि कमी जोखमीचा पर्याय म्हणून मुदत ठेवींकडे पाहिले जाते. आरबीयाने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांवर जास्त व्याजदर देण्यात येत आहे. बजाज फायनान्सने सुद्धा मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. Bajaj Finance FD बजाजने 25 बेसीस पॉइंटने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचा दर
ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळणारा व्याजदर 7.95 टक्के झाला आहे. 36 ते 60 महिन्यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणूकीवर 7.75 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर 44 महिन्यांपुढील विशेष योजनांवर 7.95 व्याजदर मिळेल. नवे दर 22 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. नव्या मुदतठेवी आणि नूतनीकरण करण्यात येणाऱ्या 5 कोटींपर्यंतच्या एफडींवर हा दर मिळणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी एफडी व्याजदर
सर्वसामान्य ग्राहकांना रेग्युलर मुदत ठेव योजनेतून 36 ते 60 महिन्यापर्यंतच्या योजनांवर ७.५ टक्के व्याजदर मिळणार आहे. विशेष मुदत ठेव योजनांवर ७.७ टक्के दर देण्यात येत आहे.
5 लाख गुंतवले तर मिळणार 6.60 लाख
बजाज फायनान्सच्या नव्या दरानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या 44 महिन्याच्या स्पेशल पिरियड योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर 6 लाख 60 हजार रुपयांपर्यंत परतावा मिळेल. म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपये व्याज मिळेल.
नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील पीएनबी बँकेने विशिष्ट मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार 666 दिवसांच्या ठेवींवरील व्याजदर 7.25% इतका करण्यात आला आहे. यापूर्वी त्यावर 6.30% व्याज मिळत होते. त्याचप्रमाणे तीन आणि 10 वर्ष मुदतींच्या ठेवींवरील व्याजदरात 0.40% ची वाढ करण्यात आली असून तो 6.50% केला आहे. यापूर्वी तो 6.10% होता. बँकेने ज्येष्ठ ठेवीदारांना देखील व्याजदर वाढीचे गिफ्ट दिले आहे.