सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी पद्धत म्हणून मुदत ठेवीकडे (Bank FD) पाहिले जाते. मुदत ठेव ही पारंपारिक गुंतवणूक पद्धतीमध्ये गणली जाते. प्रत्येक बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याजदर हा वेगवेगळा असतो. जर तुम्ही मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक (Axis Bank), युनिटी बँक (Unity Bank) आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत (Suryoday Small Finance Bank) मिळणाऱ्या व्याजदराबद्दल जाणून घ्या. तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक 5 वर्षासाठी केली, तर कोणत्या बँकेतून तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळेल जाणून घेऊयात.
मुदत ठेवीवरील व्याजदर जाणून घ्या
खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक (Axis Bank) आपल्या ग्राहकांना मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर देत आहे. नुकतेच बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर बदलले आहेत. हे नवीन व्याजदर 17 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. ही बँक 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवरील कालावधीसाठी 3.5% ते 7.20% व्याजदर देत आहे. जर तुम्ही या बँकेच्या मुदत ठेवीमध्ये 5 वर्षासाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर सर्वसामान्य नागरिकांना 7% व्याजदर, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर मिळणार आहे. या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी सर्वसामान्य नागरिकांना 1,41, 478 रुपयांचा परतावा मिळणार आहे. तर जेष्ठ नागरिकांना 1,46,784 रुपयांचा परतावा मिळेल.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank) देखील आपल्या ग्राहकांना मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर देत आहे. ही बँक 7 दिवसापासून ते 10 वर्षांच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना 4% ते 9.1% व्याजदर देणार आहे. या बँकेत तुम्ही 5 वर्षासाठी मुदत ठेव केली, तर सर्वसामान्य नागरिकांना 9.1% तर ज्येष्ठ नागरिकांना 9.60% व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी सर्वसामान्य नागरिकांना 1,56,816 रुपयांचा परतावा मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना 1,60,694 रुपयांचा परतावा मिळेल.
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने (Unity Small Finance Bank)मुदत ठेवीवरील व्याजदरात नुकताच बदल केला आहे. या नव्या व्याजदरानुसार ग्राहकांना 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या काळासाठी 4.5% ते 9% व्याजदर दिला जाणार आहे. जर तुम्ही या बँकेमध्ये पाच वर्षासाठी गुंतवणूक केली, तर सर्वसामान्य नागरिकांना 9% तर ज्येष्ठ नागरिकांना 9.5% व्याजदर मिळणार आहे. या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी सर्वसामान्य नागरिकांना 1,56,051 रुपये परतावा मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना 1,59,911 रुपयांचा परतावा मिळणार आहे.