8 फेब्रुवारी रोजी आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआर (MCLR) वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने (Axis Bank) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या एमसीएलआर (MCLR) मध्ये 10 बेस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे. आता अॅक्सिस बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. बँकेचे नवीन दर दोन दिवसांपूर्वी पासून लागू झाले आहेत.
बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षासाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग वर आधारित असतात. अशा परिस्थितीत एमसीएलआर (MCLR) वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते. त्यामुळे आता तुम्हाला कर्ज घेताना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
Table of contents [Show]
एमसीएलआर म्हणजे काय?
एमसीएलआर (MCLR) म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI- Reserve Bank of India) ने सुरू केला. बँक कोणत्याही ग्राहकाला या आधारभूत दरापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही. बँका अनेकदा एमसीएलआर (MCLR) पेक्षा जास्त दरानेच कर्ज देतात. त्याच्या मदतीने बँका कर्जाचा दर ठरवतात. जेव्हा ते वाढते तेव्हा कर्ज महाग होते आणि जेव्हा ते कमी होते तेव्हा कर्ज स्वस्त होते.
अॅक्सिस बँकेचे नवीन एमसीएलआर दर
अॅक्सिस बँकेने ओव्हरनाईट एमसीएलआर दर 8.70%, 1 महिन्यासाठी एमसीएलआर दर 8.70% आणि 3 महिन्यांसाठी एमसीएलआर दर 8.80% केला आहे. त्याच वेळी, बँकेचा एमसीएलआर दर 6 महिन्यांसाठी 10 आधार अंकांनी 8.85 टक्के, 1 वर्षासाठी एमसीएलआर दर 8.80 टक्क्यांवरून 8.90 टक्के, 2 वर्षांसाठी एमसीएलआर 8.90 टक्क्यांवरून 9.00 टक्के आणि 3 वर्षांसाठी एमसीएलआर 8.95 टक्क्यांवरून 8.05 टक्के झाला आहे.
साऊथ इंडियन बँकेनेही कर्ज महाग केले
खाजगी क्षेत्रातील साऊथ इंडियन बँकेने देखील एमसीएलआर मध्ये 15-20 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. एक्सचेंजशी शेअर केलेल्या माहितीनुसार, नवीन दर 20 फेब्रुवारीपासून लागू होईल. यापूर्वी, बँकेने जानेवारीमध्ये एमसीएलआर वाढवला होता, जो 20 जानेवारीपासून लागू झाला होता.
तुमच्या कर्जावरही परिणाम होईल का?
कर्जाचे व्याजदर दोन प्रकारचे असतात. स्थिर व्याज दर आणि फ्लोटिंग व्याज दर. निश्चित दरामध्ये कर्जाच्या संपूर्ण कालावधीत व्याज स्थिर राहते. दुसरीकडे, फ्लोटिंग रेट अंतर्गत, बँकेद्वारे वेळोवेळी व्याजदर बदलला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरणांमध्ये कोणताही बदल केल्यास फ्लोटिंग व्याजदर बदलतो. हे लक्षात असूद्या की सामान्यतः निश्चित दर फ्लोटिंग दरापेक्षा किंचित जास्त असतो.