Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विम्याबद्दलची जागरुकता वाढली, आता अंमलबजावणीची गरज!

विम्याबद्दलची जागरुकता वाढली, आता अंमलबजावणीची गरज!

National Insurance Awareness Day 2022: कोरोनानं सर्वात जास्त लक्ष वेधलं ते आरोग्याकडे. आणि त्यातही सर्वाधिक जागरुकता वाढली ती विम्याविषयी (Insurance). आयुर्विमा (Life Insurance) आणि वैद्यकीय विमा (Medical Insurance) तर या दरम्यान निकडीचाच वाटू लागला.

आर्थिक नियोजनाचा अर्थ म्हणजे आर्थिक जबाबदारीची जाणीव असणं होय. यामध्ये आर्थिक उद्दिष्टांसह उत्पन्न, खर्च, मालमत्ता, दायित्त्व यांचा समावेश होतो. त्यानंतर एक आर्थिक पोर्टफोलिओ तयार करून अपेक्षित लक्ष्य साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. वाढत्या महागाईचा सामना आणि जीवनशैली कायम ठेवणं वा ती उंचावण्यासाठी येणारा खर्च यामध्ये विमा (Insurance) अपरिहार्य ठरतो. भारतासारख्या देशातही विभक्त कुटुंबांची संख्या वेगावे वाढत असताना तर विमा गरजेचाच आहे.

आर्थिक नियोजन (Financial Planning) करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून अपेक्षित उद्दिष्टं, त्यांचे टप्पे आणि डिस्पोजेबल इन्कम (म्हणजे उत्पन्न वजा खर्च) ओळखणं आवश्यक आहे. भविष्यात डिस्पोजेबल इन्कम वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या मार्गांवर विलग करावं लागतं. यामुळे ध्येयपूर्तीसाठी ठराविक निधी तयार होतो. एकूण आर्थिक नियोजनात विमा कुठे असतो? या प्रश्नाचं उत्तर मिळविणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे आणि ते आहे विमा.


भारतात विमा असणाऱ्यांची लोकसंख्या तुलनेत कमी आहे. शिवाय येथील घनता ही जागतिक सरासरीपेक्षादेखील कमी आहे. मार्च 2020 ते मे 2021 दरम्यान म्हणजेच भारतात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षातच विमाधारकांनी आरोग्य विमा (Health Insurance) असूनही त्यांच्या रुग्णालय आदी वैद्यकीय खर्चापोटी 40 टक्के रक्कम ही खिशातून भरली. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येपासून कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी विमा महत्त्वाचा ठरतो. विमा हे सुरक्षिततेचं कवच म्हणून कार्य करतं आणि विमा योजना घेण्यासाठी ‘लवकरात लवकर’ ही वेळच योग्य ठरते. विमा हे एक उत्पादन म्हणून आर्थिक संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे. विमा हा आर्थिक पोर्टफोलिओचा एक महत्त्वाचा भाग आहे.

जोखीम छत्र (Risk Management)

विमा हे जोखीम कमी करण्याचं एक उत्तम साधन आहे. त्यामुळे मृत्यू किंवा रुग्णालयात दाखल होण्यासारख्या कोणत्याही अनपेक्षित घटनेत होणार्‍या आर्थिक नुकसानाचा सामना करण्यासाठी तयार असतात.

आर्थिक सुरक्षा (Financial Security)

आपत्कालीन परिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई करून विमा योजना आर्थिक सुरक्षा देऊ करतात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास विमा योजनेचे नुकसान होईल याची धास्ती असते. मात्र ते आर्थिक नियोजनात आणि उद्दिष्टांसाठी निधी उभारण्यास साहाय्य करते. त्याचबरोबर नियोजित निधी सुरक्षित असून आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात आणला जात नाही, हेदेखील सुनिश्चित करतं.

भिन्न गरजांसाठी निराळ्या योजना (Different Plans for Different Needs)

भेडसावणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी विविध प्रकारच्या जोखमेला संरक्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या विमा योजना आज अस्तित्वात आहेत. जीवन विमा योजना ही व्यक्तीच्या अकाली मृत्युचा धोका टाळण्यास मदत करतात. तर आरोग्य विमा योजना ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरतात. तसंच वाहन विमा योजना, रस्ते अपघात किंवा वाहन चोरीचा धोकाही याद्वारे संरक्षित होतो. प्रवास विमा योजना ही सहलीशी संबंधित आकस्मिकतेचे छत्र देऊ करतात.

कर लाभाची जोड (Tax Benefit)

जीवन आणि आरोग्य विमा योजना या एक प्रकारे कर बचत योजनादेखील आहेत. जीवन विम्यासाठीचा हप्ता हा (प्रीमियम) प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कपातीसाठी पात्र ठरतो. तर आरोग्य विम्यासाठी भरावा लागणारा हप्ता प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत कपातीसाठी पात्र ठरतो. या दोन्ही वजावट करपात्र उत्पन्न वार्षिक 2.50 लाख रुपयांच्या (कलम 80C अंतर्गत 1.5 लाख आणि कलम 80D अंतर्गत 1 लाखांपर्यंत) कमी करण्यात साहाय्य करतात. एखादी व्यक्ती प्राप्तीकराच्या कलम 30 टक्के कर टप्प्यात (ब्रॅकेट) असल्यास ही वजावट 75,000 चा कर वाचवू शकते.

जीवन विमा योजनेंतर्गत मृत्यूलाभ पूर्णपणे करमुक्त आहे. मॅच्युरिटी बेनिफिटदेखील कलम 10 (10D) च्या तरतुदींनुसार करमुक्त (विशिष्ट अटी व शर्तींच्या अधीन राहून) आहे. विमा योजनांमध्ये गुंतवणूक करून कर नियोजनदेखील करणं सुलभ होऊ शकतं.

निधीचे व्यवस्थापन (Wealth Management)

विम्याद्वारे दैनंदिन खर्चावर लक्ष केंद्रित केले जाऊन कर्ज कमी करणं वा स्थिर रोकडप्रवाह स्थापित करता येऊ शकतो. त्याचबरोबर आपत्कालीन निधी तयार करणं, बचत वाढवणं आणि पुरेसं विमा संरक्षण निवडणं यावर आरोग्य आणि जीवन विम्याच्या माध्यमातून लक्ष भर दिला जाऊ शकतो. गुंतवणूक पोर्टफोलिओ, सेवानिवृत्ती निधी आणि कर लाभ आणि सवलतींचा कार्यक्षमतेनं उपयोग करणं महत्त्वाचं असतं. सेवानिवृत्ती निधीचे उत्पन्नामध्ये रूपांतर करून आणि निवृत्तीवेतन अधिकाधिक प्रमाणात संचयित करून आर्थिक स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो.

आर्थिक नियोजनातील हे महत्त्वाचे टप्पे असून त्यातून संपत्ती निर्मितीपूर्वी विमा हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. तेव्हा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये विमा योजना हा पर्याय असणं खूपच आवश्यक ठरतं.

वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 ते 12 पट विमा छत्र असावं, असा ढोबळ नियम आर्थिक सल्लागारांकडून सांगितला जातो. समजा एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 25 लाख रुपये असल्यास किमान 2.50 ते 3 कोटी रुपयांचे विम्याचे छत्र (कव्हरेज) असणं आवश्यक आहे. तर आरोग्य विम्याबाबत, वार्षिक उत्पन्नाच्या 50 टक्के आणि गेल्या तीन वर्षांतील एकत्रित रुग्णालयाशी संबंधित खर्चाच्या देयकाच्या (बिल) बरोबरीने विमा संरक्षण असावे. वार्षिक उत्पन्न 25 लाख रुपये असल्यास आणि गेल्या समजा तीन वर्षांत आजाराशी संबंधित खर्च 2.50 लाख रुपये आला असले तर विमा छत्र किमान 15 लाख रुपये असायला हवे.

विमा योजनेची निवड पूर्णपणे संबंधित व्यक्तीच्या गरजांवर अवलंबून असते. विम्याच्या साहाय्याने आर्थिक जोखमी संरक्षित करणं आवश्यक आहे.