म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही सर्वसामान्यांना अप्रत्यक्षपणे मार्केटमध्ये सहभागी होण्याची आणि त्यातून दीर्घकाळासाठी मोठा फंड उभारण्याची संधी देते. पण ही गुंतवणूक करत असताना त्यातील नफा अधिकाधिक वाढावा व नुकसान कमी व्हावे. यासाठी काही बेसिक चुका टाळणे गरजेचे आहे.
सध्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे (SIP) अगदी किमान पैशांद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येत असल्यामुळे, यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण मोठ्या संख्येने इतर लोक यामध्ये गुंतवणूक करत आहेत, म्हणून आपणही गुंतवणूक केली पाहिजे. असा विचार योग्य नाही. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक (Investment) मानली जाते. त्यामुळे एखाद्या फंडाने मागील वर्षात चांगला परतावा दिला म्हणजे तो पुढील काही वर्षात देखील त्याचपद्धतीने परतावा देईल. यावर पूर्णत: अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काही बेसिक चुका टाळणे गरजेचे आहे.
Table of contents [Show]
पुरेसा रिसर्च नाही
आपल्याकडे गुंतवणूक करताना दुसऱ्याला किती दिवसांत किती परतावा मिळाला. यावर आधारित केली जाते. पण अशी गुंतवणूक करताना त्याची गरज काय होती. आपली गरज काय आहे. असा विचारच केला जात नाही. प्रत्येकवेळी दुसऱ्यांना जितका परतावा मिळाला तेवढाच आपल्याला देखील मिळेल. हा चुकीचा विचार आहे. यासाठी डिटेल रिसर्च करणे गरजेचे आहे. कारण आपण आपल्या मेहनतीचे पैसे गुंतवताना शंभरवेळा विचार केलाच पाहिजे.
गुंतवणूक ही जशी पैसे वाढवण्यासाठी केली जाते. तसेच त्यामागे एक आर्थिक ध्येय देखील असते. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याचा कालावधी आणि त्याची किंमत लक्षात घेऊन आपल्याला कोणता फंड त्यानुसार चांगले रिटर्न देऊ शकतो. असा बेसिक विचार करून त्यानुसार रिसर्च करणे गरजेचे आहे.
मागील वर्षातील परताव्यावर लक्ष केंद्रीत
सध्याच्या घडीला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना एखाद्या फंडने मागील काही वर्षात कशा पद्धतीने परतावा दिला आहे. एवढेच पाहिले जाते. यातून काही गोष्टी समजण्यास मदत होते. पण प्रत्येकवेळी हाच नियम लागू होईल. याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही.
मागील काही वर्षातील रिटर्नसोबतच त्या फंडद्वारे केली जाणारी गुंतवणूक पाहता येऊ शकते. कंपनीचे भविष्यातील प्लॅन (Future Plan) काय आहेत. यापूर्वी त्या कंपनीने ते किती पूर्ण केले आहेत. हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. यातून कंपनीचा गुंतवणुकीचा फोकस स्पष्ट होतो.
शेअर मार्केटची तुलना
म्युच्युअल फंडमध्ये जमा होणारी गुंतवणूक ही विविध गुंतवणुकीच्या पर्यायांसोबत शेअर मार्केटमध्ये ही केली जाते. पण त्याची तुलना शेअर मार्केटसोबत करणे योग्य नाही. कारण शेअर मार्केटमध्ये शॉर्टमध्ये चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता असते. पण त्याचबरोबर त्यात तेवढीच जोखीम सुद्धा असते. पण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी केली जाते. त्यामुळे यामधील जोखीम त्या तुलनेत कमी होण्यास मदत होते. यासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दीर्घकाळाचा विचार करूनच त्यात गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.
वैविध्यपूर्ण गुंतवणुकीकडे दुर्लक्ष
गुंतवणुकीच्या अनेक नियमांपैकी वैविध्यपूर्ण गुंतवणूक हा नियम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. बरेच जण एका फंडमधून चांगला परतावा मिळत असेल तर आपल्याकडील सर्व रक्कम त्यात गुंतवण्याचा विचार करतात. पण ही चुकीचा विचार ठरू शकतो. कारण त्या फंडने अपेक्षित परतावा दिला नाही किंवा त्यामध्ये नुकसान झाले. तर त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. यासाठी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फंडमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.
गुंतवणुकीचा आढावा न घेणे
आपण केलेल्या गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे आहे. आपण ज्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक केली आहे. ती पूर्ण होत नसेल त्यात लगेच बदल करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला भविष्यात मिळणाऱ्या अपेक्षित परताव्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी केलेल्या गुंतवणुकीचा आढावा घेऊन त्यात परिस्थितीनुसार करेक्शन करणे गरजेचे आहे.
गुंतवणूक करताना अशाप्रकारे चौफेर विचार करणे गरजेचे आहे. कारण एका गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून त्यातून नेहमीप्रमाणे अपेक्षित परतावा मिळेलच हे कोणीही सांगू शकत नाही. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सहज-सोपी आणि किमान पैशांपासून सुरू करता येणारी असली तरी, त्याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. त्यामुळे इथून पुढे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना वरील कॉमन चुका टाळा. जेणेकरून तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)