तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतात ऑटो एक्स्पोला आज बुधवारी 11 जानेवारी रोजी दिल्ली आणि नोएडामध्ये सुरुवात झाली आहे. येत्या 18 जानेवारीपर्यंत ऑटो एक्स्पो सुरु राहणार आहे. ऑटो एक्स्पोसाठी टाटा मोटर्सने जोरदार तयारी केली आहे. टाटा मोटर्सकडून थोड्याच वेळात हॅरियर, सफारी आणि अल्ट्रोझ या तीन नवीन इलेक्ट्रिक वाहनांचे सादरीकरण केले जाणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केला तर टाटा मोटर्स सध्या भारतीय बाजारपेठेत आघाडीची कंपनी आहे. कंपनीकडून ईलेक्ट्रिक वाहनांचा पोर्टफोलिओ आणखी विस्तारला जाणार आहे. कंपनीकडून ऑटो एक्स्पो 2023 मध्ये टाटा हॅरियर, सफारी आणि अल्ट्रोझ या वाहनांच्या प्रमुख इलेक्ट्रिक आवृत्त्या असतील. नुकताच कंपनीकडून या ईव्हींचा टीझर जारी करण्यात आला होता. टाटा मोटर्स त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा पंचचे ईव्ही मॉडेल्सदेखील सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टाटा मोटर्सच्या नेक्सॉन ईव्ही, टिगोर ईव्ही आणि टियागो ईव्ही या तीन इलेक्ट्रिक कार्सनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. इलेक्ट्रिक हॅरियर, सफारी, अल्ट्रोझ आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील पंचला ईलेक्ट्रिक प्रकारात लाँच केल्याने भारतातील ईव्ही श्रेणीतील टाटा मोटर्सचे स्थान आणखी भक्कम होण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्सने गेल्या वर्षी एक्सएम आणि एक्सएमए मॉडेल्सवरील हॅरियर एसयूव्हीचे (Harrier SUV)दोन नवीन प्रकार लॉन्च केले होते. नवीन एक्सएमएसची एक्स-शोरूम, मुंबईसाठी किंमत 17.20 लाख होती आणि एक्सएमएएसची एक्स-शोरूम, मुंबईसाठी किंमत 18.50 लाख आहे. या SUV ला पॅनोरॅमिक सनरूफ आणि हाय-एंड मॉडेल्समधील इतर वैशिष्ट्ये मिळतात.
नवीन हॅरियरमध्ये 2.0-लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन असून 170 एचपी आणि 350 एनएम टॉर्क पॉवर देते. एक्सएमएस व्हेरियंटला सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. एक्सएमएएस व्हेरिएंटला सहा-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश आहे. सर्व नवीन हॅरियरमध्ये पॅनोरामिक सनरुफचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, एक्सएमएस आणि एक्सएमएएस मॉडेल्सना ऑटोमॅटिक हेडलँप, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, आठ-स्पीकर सिस्टम, रेन-सेन्सिंग वायपर, टच-स्क्रीन इन्फोटेनमेंट, इलेक्ट्रिकली फोल्ड करण्यायोग्य बाहेरील रीअरव्ह्यू मिरर आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.