Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मुदत ठेवींवर बँकांकडून आकर्षक व्याजदर

मुदत ठेवींवर बँकांकडून आकर्षक व्याजदर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दर (Repo Rate) वाढविल्यानंतर कर्जावरील व्याजदर वाढवल्याने सामान्यांना घाम फुटलाय. पण त्याचवेळी काही बँकांनी मुदतठेवींवरील व्याजदर वाढवून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरामध्ये वाढ केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बंधन बँक (Bandhan Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहे. आरबीआयने रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ केली असून तो आता 4.40 टक्के केला आहे. तसेच कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) सुद्धा 0.5 टक्क्यांनी वाढवल्यामुळे मुदत ठेवींवरील व्याजदरही वाढले आहेत.

कॅश रिझर्व्ह रेशो दर म्हणजे काय? What is Cash Reserve Ratio Rate?

बँकांना त्याच्या निव्वळ मागणी व मुदत ठेवीपैकी ज्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडे किमान ठेवी ठेवाव्या लागतात, त्या प्रमाणाला रोख राखीव प्रमाण म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो रेट म्हणतात. रोख राखीव प्रमाण वाढविल्यास बँकांना अधिकची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागते.

मुदत ठेवीवर व्याजदर का वाढतो!

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) देशातील बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते त्या व्याजदराला रेपो  दर (Repo Rate) म्हणतात. जेव्हा बँकांना आरबीआयकडून महागडी कर्जे मिळतात. तेव्हा बँकांना त्यांच्या एकूण ठेवींपैकी काही टक्के रक्कम रोख स्वरूपात आरबीआयकडे जमा करावी लागते. आता कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) दर 4 वरून 4.5 टक्के झाला आहे. त्यामुळे बँकांना आता आरबीआयमध्ये पूर्वीपेक्षा जास्त रोकड जमा करावी लागणार आहे. रेपो दर आणि सीआरआर वाढल्याने बँकांकडे असलेली रोकड कमी होईल. जर रोख रक्कम कमी असेल तर बँका कर्जाचे वितरण कमी करतात.  ही रोख रक्कम बँकेकडे मुदत ठेवींच्या माध्यमातून येत असते. अशावेळी ग्राहकांनी जास्तीतजास्त पैसे मुदत ठेवीत गुंतवावे, म्हणून बँका मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवून देतात.

कोणकोणत्या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Bank)

एसबीआय बॅंकेने 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मुदत ठेवी या 40-90 बीपीएसने वाढल्या आहेत. 7 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर तीन टक्क्यांवरच ठेवला आहे. तर 46 ते 179 दिवसांसाठी तो 3 टक्क्यांवरून 3.5 टक्के करण्यात आला आहे. 180 ते 210 दिवसांच्या कालावधीत ठेवींवरील व्याजदरात 40 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली आहे. 211 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 3.3 टक्क्यांवरून 3.75 टक्के करण्यात आला आहे.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)

आयसीआयसीआय बँकेनेही (ICICI Bank) व्याजदारात वाढ केली आहे. मात्र, 2 कोटी ते 5 कोटी रुपये एवढी मुदत ठेवी असणाऱ्या ग्राहकांनाच याचा फायदा होणार आहे. बँकेकडून मुदत ठेवीच्या दरात 25 बेसिस पॉईंटने वाढ करण्यात आली आहे. वेगवेगळ्या काळासाठी मुदत ठेवींचा व्याजदर हा वेगवेगळा ठेवण्यात आला आहे.

कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)

कोटक महिंद्राने 2 कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या मुदत ठेवीवर व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 390 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 30 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. 23 महिन्याच्या मुदत ठेवींवर 35 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे.

बंधन बँक (Bandhan Bank)

बंधन बँकेने एका वर्षावरून 18 महिन्यांपर्यंतच्या आणि 18 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींवरील व्याजदरात 50 बेसिस पॉईंट्सनी वाढ केली आहे.

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे अनेक बॅंकांची गृह, वाहन, वैयक्तिक कर्जे महागली, हे खरं आहे! पण त्याचबरोबर बँकेत ठेवलेल्या मुदतठेवींवरील व्याजदर ही वाढले आहेत. यामुळे तुमच्या इतर पारंपरिक गुंतवणुकीवर तुम्हाला अधिक परतावा मिळू शकतो. पण बऱ्याच गुंतवणुकीवरील परतावा हा करपात्र असल्याने अधिकृत आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्या.