सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली आहे. त्यामुळेच अनेक कंपन्यांनी आता आधुनिक फीचर्स सहित इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत लॉन्च केल्या आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी एथरने देखील आपल्या आगामी 'Ather 450S' स्कूटरची प्री बुकिंग सुरू केली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही स्कूटर 3 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र लॉन्चपूर्वीच कंपनीने या स्कूटरची प्री बुकिंग सुरू केली आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती कंपनीने ट्विटर पेजवर शेअर केली आहे. ग्राहकांना Ather 450S स्कूटर बुक करायची असेल, तर किती रुपये मोजावे लागतील जाणून घेऊयात.
प्री-बुकिंगची रक्कम जाणून घ्या
इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी एथरने जून महिन्यात 'Ather 450S' स्कूटर 3 ऑगस्ट 2023 रोजी लॉन्च करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र एथरची प्रतिस्पर्धी असलेल्या ओला कंपनीने त्यांच्या S1 इलेक्ट्रिक स्कूटरची प्री-बुकिंग सुरू केल्यानंतर एथरने लॉन्चपूर्वीच प्री-बुकिंगला सुरूवात केली आहे. ग्राहकांना ही स्कूटर 2500 रुपये टोकन भरून बुक करता येणार आहे. ही रक्कम पूर्णतः रिफंडबल आहे. म्हणजेच स्कूटर बुक केल्यानंतरही ग्राहकांनी Ather 450S खरेदी केली नाही, तर त्यांना बुकिंगवेळी भरलेली रक्कम परत मिळणार आहे.
'Ather 450S' ची किंमत जाणून घ्या
Ather 450S हे कंपनीचे एंट्री लेव्हल मॉडेल आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1,29,999 रुपये आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 125cc सेगमेंटमधील Ola S1, टीव्हीएस (TVS) यासारख्या कंपन्यांना स्पर्धा निर्माण करणार आहे.
'Ather 450S' स्कूटरचे फीचर्स जाणून घ्या
Ather 450S स्कूटर 125cc सेगमेंट प्रकारातील असून यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स कंपनीने दिले आहेत. या स्कूटरमधील बॅटरी 3kWh युनिट क्षमतेची आहे. ही बॅटरी एकदा पूर्णतः चार्ज केली की, 115 km चे मायलेज देणार आहे. तसेच 90 किलोमीटर प्रतितास वेगाने ही स्कूटर धावणार आहे. यातील 6.4kW इलेक्ट्रिक मोटर 26 Nm टॉर्क जनरेट करणार आहे. या स्कूटरमध्ये एलईडी स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एलईडी लाईट्स यासारखे अनेक फीचर्स दिले आहेत.