ASCI Rules: ऑनलाइन चॅरिटी गोळा करणाऱ्या अनेक कंपन्या मागील काही वर्षात सुरू झाल्या आहेत. क्राऊडसोर्सिंग म्हणजेच जनतेकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी ऑनलाइन जाहिरातींचा वापर या कंपन्यांकडून केला जातो. लहान मुलांच्या हृदयरोपण शस्त्रक्रियेसाठी किंवा अपंग मुलाच्या उपचारासाठी पैसे उभे करण्याचे कॅम्पेन या कंपन्यांकडून राबवले जाते. लहान मुलांसोबत मोठ्या व्यक्तींच्या उपचारासाठीही पैशांची मदत मागितली जाते. मात्र, आता या कंपन्यांसाठी अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउंन्सिल ऑफ इंडियाने (ASCI) नियमावली तयार केली आहे.
शुल्कासंबंधी काय आहेत नियम?
जमा झालेल्या निधीमधील किती टक्के रक्कम शुल्क स्वरुपात आकारली जाते हे चॅरिटी कंपनीला जाहीर करावे लागणार आहे. कारण, या चॅरिटी फर्म काही रक्कम शुल्क आणि इतर खर्चाच्या स्वरुपात स्वत:कडे ठेवतात. आणि इतर रक्कम रुग्णाच्या उपचारासाठी देतात. मात्र, आता ऑनलाइन डोनेशन मागताना ही शुल्काची रक्कम किती आहे हे कंपन्यांना जाहीर करावे लागणार आहे. त्यामुळे देणगीदारालाही नक्की आपण दिलेले किती पैसे गरजूंपर्यंत पोहचतात याची माहिती मिळेल.
अल्पवयीन बालकांचे फोटो, व्हिडिओ वापरता येणार नाहीत
वैद्यकीय उपचारांसाठी मदत मागताना या चॅरिटेबल संस्थांकडून जाहिरातीमध्ये रुग्ण अतिशय बिकट अवस्थेत दाखवला जातो. रुग्णाला दु:ख, यातना, खूप कष्ट सोसावे लागत असल्याचे दाखवले जाते. तसेच रुग्णाचे कुटुंबीय सुद्धा अतिशय दु:खात असल्याचे दाखवले जाते. या व्हिडिओ आणि छायाचित्रांमुळे नागरिक अस्वस्थ होऊ शकतात. त्यामुळे जाहिरात करताना चॅरिटेबल संस्थांना लहान बालकांचे फोटो, व्हिडिओ दाखवता येणार नाहीत.
ऑनलाइन चॅरिटी प्लॅटफॉर्म केटो कंपनीकडून नागरिकांनी दिलेल्या देणगीतील 5% भाग लगेच कापला जातो. तर इतर रक्कम गरजूंना दिली जाते. असे इतरही अनेक प्लॅटफॉर्म आहे. ज्याच्या युट्युब, सोशल मीडिया आणि विविध संकेतस्थळावर जाहिराती सुरू असतात.
नागरिकांच्या भावनांना साद घालून मदतीची याचना
वैद्यकीय उपचारासोबतच इतरही अनेक गोष्टींसाठी चॅरिटेबल संस्था देणगी मागतात. त्या सर्वांना देणगीवर किती शुल्क आकारले जाते, याची माहिती द्यावी लागणार आहे. या चॅरिटेबल संस्था वेदनाने विव्हळत असलेल्या रुग्णाचे व्हिडिओ दाखवून नागरिकांच्या भावनांना हात घालतात. त्यातून या कंपन्यांना मोठी देणगीही मिळते. मात्र, आता जाहिरात नियामक संस्थेने जाहिरात करण्यावर बंधन घातले आहे.