देशात मॉन्सूनचं (Monsoon) आगमन झालं आहे. सध्या मॉन्सून खोळंबला असला तरी त्याचे काही परिणाम दिसून येत आहेत. उद्योग जगतातल्या आकडेवारीवरून मिळालेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोल-डिझेलची मागणी कमी झाली आहे. देशात सर्वाधिक वापरल्या जाणार्या तेल डिझेलची मागणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वार्षिक 6.7 टक्के कमी होऊन 3.43 दशलक्ष टन झाली आहे. याआधी कृषी क्षेत्रातली मागणी वाढल्यामुळे एप्रिलमध्ये डिझेलची विक्री 6.7 टक्के आणि मे महिन्यात 9.3 टक्क्यांनी वाढली होती. मात्र जूनच्या पहिल्या 15 दिवसांचा आढावा घेतल्यास ती कमी झाली आहे.
Table of contents [Show]
जूनच्या पहिल्या पंधरवड्यातली स्थिती
मासिक आधाराचा विचार केल्यास जूनच्या पहिल्या पंधरवड्यात डिझेलच्या विक्रीत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 ते 15 मे या कालावधीत 33.1 लाख टन डिझेलची विक्री झाली. 1 ते 15 जून दरम्यान पेट्रोलची विक्री वार्षिक 5.7 टक्क्यांनी घटून 1.3 दशलक्ष टन झाली आहे. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर ही विक्री 3.8 टक्के दरानं घसरली.
मॉन्सूनचं आगमन आणि तापमानात घट
औद्योगिक आणि कृषी व्यवसायात वाढ झाल्यानं मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढली होती. मात्र मॉन्सूनच्या आगमनानं तापमानात घट झाली आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात शेतात सिंचनासाठी डिझेल जनसेटचा कमी वापर त्याचबरोबर ट्रॅक्टर-ट्रकमध्ये त्याची विक्री कमी झाली. त्यामुळे एकूणच डिझेलच्या विक्रीत घट झाली आहे.
पेट्रोल-डिझेलचा वापर
1 ते 15 जून दरम्यान पेट्रोलचा वापर कोविड-19 साथीच्या काळात जून 2021पेक्षा 44.2 टक्क्यांनी जास्त होता आणि 1 ते 15 जून 2019 पूर्वीच्या महामारीच्या तुलनेत 14.6 टक्के जास्त होता. डिझेलचा वापर 1 ते 15 जून 2021च्या तुलनेत 38 टक्के आणि जून 2019च्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत 8.8 टक्क्यांनी जास्त होता.
विमान वाहतूक क्षेत्र सक्रिय
विमान वाहतूक क्षेत्र सतत सक्रिय राहिलं. भारतातल्या विमानतळांवरची हवाई प्रवासाची पातळी ही कोविडपूर्व पातळीच्या जवळपास पोहोचली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (ATF) मागणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वार्षिक 2.6 टक्क्यांनी वाढून 2,90,000 टन झाली आहे. हे 1-15 जून 2021च्या आकडेवारीपेक्षा 148 टक्क्यांनी जास्त आहे. परंतु 1-15 जून 2019पेक्षा 6.8 टक्क्यांनी कमी आहे. 1-15 मे 2023च्या 3,01,900 टनावरून विमान इंधनाची मागणी 3.9 टक्क्यांनी कमी झाली आहे.
अर्थव्यवस्थेला गती
सार्वजनिक आणि खासगी भांडवली गुंतवणुकीत वाढ झाली. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. सेवा क्षेत्र मजबूत झाल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्रातही तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातल्या इंधनाच्या मागणीत वाढ होत आहे. मजबूत औद्योगिक घडामोडी याला कारणीभूत असल्याचं संबंधिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
एलपीजीची स्थिती काय?
एलपीजीच्या (Liquefied Petroleum Gas) मागणीचा विचार करता 1 ते 15 जून दरम्यान एलपीजीची विक्री वार्षिक 1.3 टक्क्यांनी कमी होऊन 1.14 दशलक्ष टन झाली. एलपीजीचा वापर 1-15 जून 2021पेक्षा 3.3 टक्क्यांनी जास्त आहे. तसंच कोविड पूर्व 1-15जून 2019च्या आकड्यांपेक्षा 26.7 टक्के जास्त आहे. मासिक आधारावर विचार केल्यास एलपीजी गॅसची मागणी 6.2 टक्क्यांनी कमी झाली आहे. 1-15 मे 2023 रोजी एलपीजीची मागणी 1.22 दशलक्ष टन इतकी होती.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            