Monsoon in India: चालू वर्षात एल-निनो या वातावरणीय स्थितीमुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट या खासगी संस्थेनेही कमी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. अवकाळी पावसाने देशात रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. त्यात आता मान्सूनने दडी मारल्यास त्याचा परिणाम संपूर्ण भारतभर दिसून येऊ शकतो. देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून जर पुरेसा पाऊस झाला नाही तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रावर होऊ शकतो.
60% दुष्काळाचा अंदाज
"सर्वसामान्यपेक्षा कमी" पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. एल-निनोच्या परिस्थितीमुळे भारतात 60% दुष्काळाची शक्यताही वर्तवली आहे. नैऋत्य वारे भारतात पाऊस घेऊन येतात. मात्र, समुद्रात तयार होणाऱ्या एल-निनो प्रभावामुळे नैऋत्य दिशेकडून येणारे वारे क्षीण असतील. हे वारे कमजोर असल्याने भारतावरून ते कमी प्रमाणात वाहतील. त्यामुळे पाऊसही कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरवर्षी जूनमध्ये भारतात मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावेळी जून ते सप्टेंबरमध्येच पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
जून ते सप्टेंबरमध्ये कमी पावसाची शक्यता
जून आणि सप्टेंबर महिन्यात भारतात दीर्घकालीन सरासरी पाहता 94% पाऊस पडू शकतो. म्हणजेच 868.6mm पाऊस पडेल. यामध्ये 5% अंदाज चुकण्याची शक्यता गृहित धरली जाते. 94% पाऊस हा दरवर्षी पडणाऱ्या पावसापेक्षा कमी आहे. कमी पाऊस कृषी क्षेत्राची चिंता वाढवू शकतो. 90% पेक्षा कमी सरासरी पाऊस झाल्यास दुष्काळी परिस्थिती समजली जाते. जर यावर्षी पाऊस चांगला झाला नाही तर कृषी क्षेत्राला फटका बसेल. विविध उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा कृषी क्षेत्रामधून होतो. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडू शकते.
मध्य आणि उत्तर भारत राहणार कोरडा?
उत्तर आणि मध्य भारतात कमी पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्रात कमी पाऊस होईल, तसेच उत्तरेकडील राज्येही कोरडीच राहतील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. कमी पावसामुळे उत्तरेतील पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यातील कृषी उत्पादनाला फटका बसू शकतो. जूनपेक्षा मान्सूनच्या शेवटी पावसामध्ये अनियमितता जास्त असेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.
महागाईची आकडेवारी
फेब्रुवारी महिन्यात भारतात अन्नधान्याची भाववाढ 5.95% होती. याच महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई 6.44% होती. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा जास्त महागाई भारतात आहे. कन्झ्युमर प्राइज इंडेक्समधील वस्तुंपैकी अन्नधान्याची महागाई सुमारे 40% आहे. जर मान्सूनने दगा दिला तर महागाईच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन चांगले झाले आहे. मात्र, पुढील वर्षी जर पुन्हा गव्हाचे उत्पादन रोडावले तर किंमती वाढतील.
सोबतच भाजीपाला, कडधान्ये, डेअर उत्पादने, प्रोसेस्ड फूड यासह इतरही खाद्यपदार्थांच्या किंमती वाढतील. कमी पावसामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. चाऱ्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले तर दुधाचे दर वाढतील. परिणामी दुधापासून तयार होणारे सर्वच उत्पादने महाग होतील. धरणांतील पाणीसाठी कमी झाला तर पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही पाणी उपलब्ध राहणार नाही. सध्या जगभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारताची स्थिती थोडी चांगली आहे. मात्र, जर मान्सूनचा पाऊस पुरेसा झाला नाही तर महागाई वाढू शकते.