Maharashtra Overseas Scholarship: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही. या विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असूनही फक्त त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अशा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा. त्यांनाही परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेणे कठीण असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये, या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा. यासाठी अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकारतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमाकरीता प्रवेश मिळाला आहे, अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
शिष्यवृत्तीतून कोणता खर्च मिळतो
या शिष्यवृत्ती अंतर्गत परदेशातील संबंधित विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या अभ्यासक्रमाची संपूर्ण फी आणि इतर खर्च सरकारकडून दिला जातो. या योजनेंतर्गत अमेरिका आणि इतर देशांमधील शिक्षणासाठी 14 हजार अमेरिकन डॉलर तर ब्रिटनसाठी 9 हजार पौंड इतका वार्षिक निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना दिला जातो. याशिवाय पुस्तके, अभ्यास दौरा आदी खर्चासाठी अमेरिका व इतर देशांसाठी 1375 अमेरिकन डॉलर तर ब्रिटनसाठी 1 हजार पौंड इतकी रक्कम देण्यात येते. तसेच विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम झाल्यानंतर परत येताना झालेला विमान प्रवास खर्च (Shortest Route & Economy Class) तिकीट सादर केल्यानंतर तो सुद्धा सरकारकडून मंजूर केला जातो. तर आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचे भाडे अॅडव्हान्समध्ये दिले जाते. याव्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा अधिक आहे; त्या विद्यार्थ्याना मिळणारा विमान प्रवास खर्चाचा लाभ जुन्या नियमानुसारच देण्यात येतो.
शिष्यवृत्तीसाठी पात्रता
- विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौध्द घटकातील असणे आवश्यक असते.
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थ्याचे वय 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
- पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 50 टक्के गुणांसह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणे गरजेचे.
सामाजिक न्याय विभागाने 2019-20 ते 2021-22 या वर्षात एकूण 530 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली आहे. या विद्यार्थ्यांवर सरकारने एकूण 11,196 लाख रुपये शिष्यवृत्तीच्या रुपात खर्च केले आहेत. समाजातील मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक पात्र इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्याशी संपर्क साधू शकतात.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            