भारतात आज (18 एप्रिल 2023) अॅपलचं स्टोअर सुरू झालं. पण पहिलं आयफोन (Iphone) मॉडेल लॉन्च झालं होतं 2007मध्ये. साधारणपणे वर्ष 2009च्या अखेरपासून आयफोनचं मॉडेल जगातल्या विविध देशांत म्हणजेच प्रमुख बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यात आलं. त्यापूर्वी 2001मध्ये अमेरिकेत जगातलं पहिलं अॅपल पार्क सुरू झालं. बाजारपेठेत आपल्या प्रॉडक्टचा दबदबा निर्माण व्हायला हवा, या उद्देशानच याची सुरुवात झाली. सध्याची स्थिती पाहिली तर अॅपलचा उद्देश सफल झाला, असंच म्हणावं लागेल. संपूर्ण जगातच नाही तर भारतातही अॅपलची क्रेझ पाहायला मिळते. मात्र असं असूनही एवढ्या मोठ्या कंपनीचं भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत एकदेखील स्टोअर नव्हतं. यामागची कारणंही तशीच आहेत. याविषयीचं वृत्त टीव्ही 9नं दिलंय.
विविध बाबींचा विचार
एखाद्या मोठ्या कंपनीला आपल्या व्यवसायाचा विचार करत असताना विविध बाबी समोर ठेवाव्या लागतात. मागणी-पुरवठा, संबंधित उत्पादनाची सर्वसामान्यांमधली ओढ यासह विविध बाबींचा विचार करावा लागतो. एखाद्या देशात आपलं स्टोअर उघडण्यासाठी संबंधित देशात किमान 30 टक्के उत्पादन तयार करणं हे बंधनकारक असतं. आता इतक्या वर्षानंतर का होईना, अॅपलनं भारतात आपला प्लांट उभारून वेगानं उत्पादन सुरू केलं आहे.
#WATCH | Apple CEO Tim Cook opens the gates to India's first Apple store at Mumbai's Bandra Kurla Complex pic.twitter.com/MCMzspFrvp
— ANI (@ANI) April 18, 2023
सहा वर्षात केला अभ्यास
अॅपलची विक्री मोठ्या स्तरावर खऱ्या अर्थानं 2007पासून सुरू झाली. वर्ष 2009मध्ये अॅपलची उत्पादनं जागतिक स्तरावरच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यात आली. अॅपलचं पहिलं पहिलं स्टोअर 2001मध्ये उघडण्यात आलं आणि प्रत्यक्ष उत्पादन विक्री 2007ला सुरू झाली. या मधल्या 6 वर्षाच्या कालावधीत कंपनीनं उत्पादन, गुणवत्ता आणि इतर मानकांवर आपल्या प्रॉडक्टची चाचणी केली. अॅपलचं उत्पादन हे एक विशेष असं उत्पादन असेल. बाजारात येताच ते धुमाकूळ घालेल, हा उद्देश समोर ठेवण्यात आला होता. जेव्हा हे साध्य झालं, त्यानंतरच 2007ला ते लॉन्च करण्यात आलं. पुढच्या दोन वर्षातच अॅपलच्या उत्पादनांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि 2009मध्ये जागतिक स्तरावर याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली.
स्टोअर आणि त्याचे फायदे
- स्टोअरच्या माध्यमातून कंपनीचे जे काही प्रॉडक्ट्स असतात त्याची योग्य प्रकारे विक्री करता येते. आपल्या प्रिमियम उत्पादनांसह विक्रीवरही लक्ष केंद्रित करता येतं.
- आयफोन हे प्रॉडक्ट महत्त्वाचं असलं तरी भारतीय बाजारात अॅपल आता आपला टीव्ही, आयपॅड, मॅकबुक आणि इतर उत्पादनांच्या विक्रीवरदेखील लक्ष केंद्रित करणार असल्याचं दिसतंय.
- भारतात एक मोठं उत्पादन केंद्र सुरू करण्याचा अॅपलचे सीईओ टीम कूक यांचा विचार या निमित्तानं दिसून येतोय.
- कंपनीची सर्व उत्पादन एकाच छताखाली उपलब्ध होण्यास यामुळे मदत मिळणार आहे.
- अॅपलनं भारतात आपला उत्पादन कारखाना उभारलाय. हा माल भारतात बनवायचा आणि भारतातच विकायचा, असा संदेशच टीम कुक यांनी या निमित्तानं दिलाय.
- आयफोन खप तर महत्त्वाचा आहेच, सोबतच आता इतर उत्पादनांमधूनदेखील पैसे कमवणं आणि आपल्या ग्राहकांनाही लाभ देणं यावर अॅपल काम करत असल्याचं दिसतंय.