मुंबई आणि दिल्ली या दोन मोठ्या शहरांमध्ये अॅपलनं नुकतेच आपले स्टोअर्स (Apple store) सुरू केलेत. अॅपलचे सीईओ टीम कुक यानिमित्त भारतात आले आणि या दोन स्टोअर्सचं उद्घाटन त्यांनी केलं. यावेळी इथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं आगळ्यावेगळ्या स्टाइलमध्ये स्वागत केलं. या कर्मचाऱ्यांबद्दलची काही इंटरेस्टिंग माहिती आपण पाहणार आहोत. या दोन्ही अॅपल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 170 इतकी आहे. मात्र हे काही सर्वसाधारण सेल्समनसारखे नक्कीच नाहीत. तर उच्चशिक्षित आहेत. यातल्या अनेकांकडे केंब्रिज (University of Cambridge, UK), ग्रिफिथ (Griffith University, Australia) यासारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची पदवी आहे. त्यामुळे अशा उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांचे पगारदेखील तसेच उच्च प्रतीचे असतील, यात शंकाच नाही.
Table of contents [Show]
एक स्टेटस सिम्बॉल
आयफोन हा केवळ मोबाइल नाही, तर भारतीयांसाठी तो एक स्टेटस सिम्बॉल झालाय. आपल्या ग्राहकांना प्रिमियम एक्सपिरियन्स देणं, ही अॅपल मोबाइलची खासियत आहे. अशा या प्रिमियम मोबाइलच्या विक्रीसाठी कर्मचारीही तसेच नियुक्त करण्यात आलेत. मुंबईच्या बीकेसीतल्या स्टोअरमध्ये ग्राहकांना 25 वेगवेगळ्या भाषांमध्ये सेवा मिळेल तर दिल्लीतल्या साकेत इथं असणाऱ्या अॅपल स्टोअरमध्ये 15 भाषा जाणणारे कर्मचारी अॅपलनं नियुक्त केले आहेत. त्यामुळे या दोन्ही स्टोअर्समध्ये कंपनीच्या ग्राहकांना ग्लोबल कस्टमर एक्सपिरियन्स मिळणार आहे.
पदव्या कोणत्या?
अॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एमटेक, एमबीए, बीटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, पॅकेजिंग, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इंजिनीअरिंग अशा अभियांत्रिकी तसंच व्यवस्थापन क्षेत्रातल्या पदव्या असणारे तरूण आहेत. या कर्मचाऱ्यांचे लिंक्डइन प्रोफाइल तपासले असता त्यांच्यापैकी काहींनी तर केंब्रिजसारख्या प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठातूनही शिक्षण घेतल्याचं स्पष्ट झालंय. अॅपलचं स्टोअर आता भारतात उघडलं गेलंय. पण अनेक भारतीय आधीपासूनच अॅपल स्टोअरमध्ये काम करत होते. असे परदेशातले काही भारतीय कर्मचारीदेखील आपल्या मायदेशातल्या या स्टोअरमध्ये काम करत आहेत. हे भारतीय युरोप किंवा पश्चिम आशियाई देशांमध्ये कंपनीचे स्टोअर ऑपरेशन्स हाताळत आहेत. त्यापैकी बहुतेकांचा अनुभव हा चांगलाच आहे.
पगारही उच्चच
अॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती असेल, असा कधी विचार केलाय का? ब्रॅंड जागतिक दर्जाचा असेल तर पगारही तसाच मजबूत असायला हवा. खरं तर रिटेल क्षेत्रातला जॉब हा भारतात भारतात नॉन-ग्लॅमरस जॉब म्हणून पाहिला जातो. मात्र 'ईटी'च्या बातमीत, उद्योग तज्ज्ञांचा हवाला देत काही माहिती देण्यात आलीय. अॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला किमान 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पगार आहेत. पगाराची ही रेंज देशातल्या इतर सामान्य इलेक्ट्रॉनिक रिटेल स्टोअरमध्ये मिळणाऱ्या पगाराच्या जवळपास 3 ते 4 पट अधिक आहे. अर्थात या विषयावर अॅपलकडून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून काही बाबी स्पष्ट होतात. अॅपल आपल्या कर्मचाऱ्यांना अधिक चांगलं पॅकेज देतंय, हेच यावरून दिसून येतंय.
सुविधांचाही मिळतो लाभ
अॅपलच्या वेबसाइटनुसार, कंपनी आपल्या कर्मचार्यांना आरोग्याच्या सुविधा, वैद्यकीय योजना, सशुल्क रजा, शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी ट्यूशन फी आणि महत्त्वाचं म्हणजे अॅपलच्या उत्पादनांवर प्रचंड सवलत देते.