डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अमेरिकेने डाळिंबावरील निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला आहे. 2018 साली अमेरिकेने भारतातून अमेरिकेत होणाऱ्या डाळिंब निर्यातीवर बंदी आणली होती. त्यामुळे डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. देशांतर्गत डाळिंबाला मिळणारा भाव कमी असल्यामुळे आणि परदेशात डाळिंबाला चांगली मागणी आणि चांगला भाव असल्या कारणाने शेतकरी परदेशी निर्यात करत होते. अमेरिकेत या फळाला चांगली मागणी होती, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक मोबदला मिळत होता. आता अमेरिकेने ही निर्यात बंदी मागे घेतल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
का घातली होती निर्यातबंदी?
2018 साली अमेरिकेने भारतातून होणाऱ्या डाळिंबावर निर्यात बंदी लादली होती. डाळिंबाच्या दाण्यांमध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव असल्याचे कारण देत अमेरिकेने ही बंदी आणली होती. या फळमाशीचा प्रादुर्भाव तेथील फळबागांवर देखील होऊ शकतो असे अमेरिकेचे म्हणणे होते.
केंद्र सरकारचे प्रयत्न
अमेरिकेने डाळिंबावर केलेली निर्यात बंदी हटवण्यासाठी केंद्र सरकार आणि इतर फलोत्पादक संघटनांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी सातत्याने चर्चा केली होती. या चर्चेत फळांवरील प्रादुर्भाव आणि त्यावर भारत सरकारद्वारे केली जातात असलेली उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच भारतातून अमेरिकेत निर्यात होणारे डाळिंब हे चांगल्या गुणवत्तेचे आणि कुठलेही प्रादुर्भाव नसलेले असतील अशी हमी देण्यात आली आहे. अमेरिकन कृषी विभागाशी झालेल्या चर्चेचा सकारात्मक परिणाम म्हणून आता ही बंदी उठवण्यात आली आहे.
450 पेट्या रवाना
अमेरिकेने डाळिंबावरील बंदी उठावल्यानंतर आता गुरुवारी प्रायोगिक तत्वावर डाळिंबाच्या 450 पेट्या न्युयॉर्कला रवाना करण्यात आल्या आहेत. तब्बल 5 वर्षानंतर भारतीय डाळिंब पुन्हा एकदा अमेरिकेला पोहोचले आहेत. डाळिंबाचे अनेक फायदे असून देशोविदेशात डाळिंबाला मोठी मागणी असते. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने रक्तदाबाच्या समस्या दूर होतात. हृदयविकार आणि कर्करोगाच्या समस्या देखील यामुळे कमी होतात असे एका अभ्यासात आढळले आहे.
अवर्षण भागात, हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यात तग धरणारे फळझाड म्हणून डाळिंब ओळखले जाते. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी हे पिक घेऊन चांगले उत्पन्न कमावले आहे. अहमदनगर समवेत पुणे, सांगली, सोलापूर, वाशीम जिल्ह्यात हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. अमेरिकेत या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात डाळिंबाची निर्यात केली जात होती, ती आता पुन्हा एकदा सुरु होणार आहे.