दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध योजना राबवल्या जातात. यापैकीच एक योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन ही आहे. या योजनेंतर्गत सरकारद्वारे दिव्यांग व्यक्तींना दरमहिन्याला ठराविक रक्कम पेन्शन स्वरुपात दिली जाते. दिव्यांगांना देखील योग्य संधी प्राप्त व्हाव्यात व त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये, हा या योजनेमागचा उद्देश आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना काय आहे व याचा लाभ कसा मिळू शकतो, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्तीवेतन योजना काय आहे?
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्तीवेतन योजना ही केंद्रपुरस्कृत योजना आहे. 2009 साली ग्रामीण विकास मंत्रालयद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. दारिद्र्यरेषेखालील दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींच्या जीवनमानात बदल व्हावी व ते दारिद्र्यरेषेच्या बाहेर यावेत, यासाठी सरकारद्वारे आर्थिक मदत दिली जाते.
कर्णबधीर, अंध, मतिमंद, बुटकेपणा सारख्या इतर दिव्यांग प्रकारात मोडणारी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. 80 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेली व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
18 ते 79 वयोगटातील दिव्यांग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेंतर्गत 18 ते 79 वयोगटातील व्यक्तींना दरमहिन्याला 300 रुपये व 80 वर्षापुढील दिव्यांग व्यक्तींना दरमहिन्याला 500 रुपये दिले जातात. याशिवाय, राज्य सरकारकडूनही मदत केली जाते.
पात्रता
- या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 79 वर्ष असावे.
- अर्ज करणारी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दिव्यांग असावी.
- व्यक्तीचे अपंगत्व 80% पेक्षा जास्त असावे.
- बुटकेपणा असलेली व्यक्ती देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकते.
- तसेच, केवळ दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीच या योजनेंतर्गत अर्ज करू शकते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- आधार कार्ड
- बीपीएल कार्ड
- वयाचा पुरावा – जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला
- अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले दिव्यांग प्रमाणपत्र
योजनेसाठी कशाप्रकारे करू शकता अर्ज?
योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार किंवा तलाठी कार्यालायाच्या माध्यमातून ऑफलाइन व उमंग अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल.