Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

US Student Visa: अमेरिकेत शिक्षणासाठी जायचंय? मग व्हिसा संदर्भातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

US student visa

अमेरिकेत शिक्षण घ्यायला जाण्यासाठी उत्सुक असाल तर व्हिसासाठी अर्ज करताना आवश्यक बाबी कोणत्या ते जाणून घ्या. विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केल्यापासून ते शिक्षणास जाईपर्यंत तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात वाचा.

US Student Visa: भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात. तुमच्या आवडत्या विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज आणि व्हिसा अॅप्लिकेशन या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर विद्यार्थ्यांना ध्यान द्यावे लागते. चालू वर्षी अनेकांनी व्हिसासाठी अर्ज केले असून कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याची चौकशी सुरू केली आहे.

U.S स्टुडंट  व्हिसाबाबत विचारले जाणारे काही प्रमुख प्रश्न?

1) स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करताना पहिल्यांदा काय करावे?

स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करताना सर्वप्रथम अमेरिकेतील ज्या विद्यापीठात किंवा संस्थेत तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिता तेथून स्वीकृती पत्र (अॅक्सेपटन्स लेटर) घ्यावे. तसेच त्या संस्थेच्या Designated Student Officer (DSO) कडून Form I-20 घ्यावा. व्हिसासाठी अर्ज करताना प्रवेशाचा पुरावा म्हणून ही कागदपत्रे लागतील.

2) प्रवेश घेण्याच्या किती आधी व्हिसासाठी अर्ज करावा?

तुम्ही प्रवेश घेत असलेला अभ्यासक्रम सुरू होण्याआधी 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष आधी तुम्ही व्हिसासाठी अर्ज करू शकता. स्वीकृती पत्र मिळाल्यानंतर 365 दिवसांच्या आत व्हिसासाठी अर्ज करण्याचा सल्ला इमिग्रेशन तज्ज्ञ देतात. व्हिसा मुलाखतींसाठी बरीच मोठी प्रतिक्षा यादी असते. त्यामुळे जर लवकर अप्लाय केले तर प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्ही निश्चिंत राहू शकता. 

3) व्हिसासाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

तुम्ही कोणत्या राजदूत कार्यालयातून किंवा कौन्सिलेटमधून अप्लाय करता यावर कागदपत्रे अवलंबून असतात. मात्र, सर्वसामान्यपणे कोणती कागदपत्रे लागतात ते पाहूया. 

तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या विद्यापीठाचा I-20 फॉर्म आणि स्वीकृती पत्र 
DS-160 व्हिसा अॅप्लिकेश फॉर्म 
व्हिसा शुल्क आणि SEVIS शुल्क भरल्याची पावती.
व्हिसा अॅप्लिकेशन लेटर 
पासपोर्ट
मागील सहा महिन्यांच्या आतील पासपोर्ट साइझ फोटो 
शैक्षणिक कागदपत्रे, त्यांचे ट्रान्सक्रिप्ट, SAT, TOEFL इ. परीक्षेत पडलेल्या गुणांचे प्रमाणपत्र  
तुम्ही भारताचे नागरिक आहात तसेच तुमचे येथील आर्थिक व्यवहार यासंबंधीचा पुरावा
बँक स्टेटमेंट आणि आर्थिक व्यवहाराचे पुरावे 

4) SEVIS शुल्क म्हणजे काय? ते शुल्क कसे भरावे?

SEVIS म्हणजे Student and Exchange Visitor Program. या योजनेद्वारे एखाद्या देशात विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. यासाठी U.S. Immigration and Customs Enforcement (ICE) कडून शुल्क आकारले जाते. तुम्ही ऑनलाइन शुल्क भरू शकता याची पावती मिळते. मुलाखतीवेळी ही पावती तुम्हाला दाखवावी लागते. 

5) व्हिसा अर्जासाठी इतर काही कागदपत्रे लागतात का?

तुम्ही अमेरिकेत शैक्षणिक शुल्क आणि इतर खर्च करण्यास सक्षम आहात हे सिद्ध करण्यासाठी आर्थिक पुरावे लागू शकतात. तसेच मुलाखत देखील महत्त्वाचा टप्पा असतो. तुम्ही भारताचे कायदेशीर नागरिक असून शिक्षणासाठी अमेरिकेला जात असल्याचे तुम्हाला कागदपत्रांतून सिद्ध करावे लागू शकते. नॉन -इमिग्रंट म्हणजे तुमचा कायम वास्तव्यास जाण्याचा हेतू नाही, अशी कागदपत्रेही लागू शकतात. व्हिसा कार्यालयातील अधिकारी ही अतिरिक्त कागदपत्रे मागू शकतात. 

6) तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात हे सिद्ध कसे कराल?

अमेरिकेतील राहण्याचा खर्च, शैक्षणिक शुल्क आणि इतर काही खर्च करण्यास तुम्ही आर्थिकदृष्या सक्षम आहात हे तुम्हाला कागदपत्रांद्वारे सिद्ध करावे लागेल. बँक स्टेटमेंट, शिष्यवृत्ती, कोणी शिक्षण स्पॉन्सर करत असेल तर स्पॉन्सरशिप लेटर तुम्हाला सादर करावे लागेल. 

7) स्टुडंट व्हिसावर तुम्ही अमेरिकेत काम करू शकता का?

F-1 visa असेल तर तुम्ही स्टुडंट व्हिसावर काम करू शकता. मात्र, विद्यापीठ कॅम्पसमध्ये किंवा काही ठराविक परिस्थितीत तुम्ही कॅम्पस बाहेरही काम करू शकता. प्रत्येक विद्यापीठानुसार हे नियम बदलू शकतात. त्यामुळे कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी याबाबतची चौकशी आधी करा. 

8) जर विवाहित असाल तर अल्पवयीन मूल अमेरिकेत शिक्षण घेऊ शकते का?

F-2 व्हिसा असणारी अल्पवयीन मुले अमेरिकेतील पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकतात. खासगी शाळेतही शुल्क भरून प्रवेश घेता येईल. 

9) स्टुडंट व्हिसा अर्ज बाद केल्यास काय कराल?

जर तुमचा व्हिसा अर्ज रद्द झाला तर कौन्सलेट कार्यालय तुम्हाला लेखी कारणासहित पत्र पाठवेल. व्हिसा नाकारण्यासाठी जी कारणे दिली असतील त्याची पूर्तता केल्यानंतर पुन्हा अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्ही इमिग्रेशन अॅटर्नीचीही मदत घेऊ शकता.

10) स्टुडंट व्हिसाचा कालावधी सुरू होण्यापूर्वीच अमेरिकेला जाऊ शकता का?

तुम्ही प्रवेश घेतलेला कोर्स सुरू होण्यापूर्वी 30 दिवस आधी अमेरिकेला जाऊ शकता. I-20 फॉर्मवर ही तारीख दिलेली असते. 

11) U.S स्टुडंट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास काय होऊ शकते?

जर स्टुडंट व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्यास तुमचा व्हिसा रद्द होऊ शकतो. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने अमेरिकेत नोकरी करू नका. तसेच ज्या कोर्सला प्रवेश घेतला आहे तो पूर्ण करा. खोटी माहिती सादर केल्यास, माहिती लपवल्यास हा फेडरल गुन्हा ठरेल. तुम्हाला अमेरिकेतून डिपोर्ट केले जाईल. तसेच पुन्हा आजीवन व्हिसा अर्ज करण्यास बंदी होऊ शकते.