Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

AgriTech Startups Success : 2027 पर्यंत देशात 8 अॅग्रीटेक युनिकॉर्न उभ्या राहणार  

AgriTech

स्टार्टअप कंपन्यांमध्ये मागच्या अॅग्रीटेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाण भारतात जास्त आहे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या गरजेमुळे या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालं आहे. आता आणखी पाच वर्षांत याच क्षेत्रात 8-10 नवीन युनिकॉर्न संस्था उभ्या राहतील असा अहवाल सादर झाला आहे.

एरवी देशात स्टार्टअप बाजारपेठ (Startup Market) फारशी चांगली नाहीए. आणि नवीन स्टार्टअप कंपन्यांनाही (Startups) तग धरणं काही अंशी कठीण जातंय. पण, तेच अॅग्रीटेक (AgriTech) कंपन्यांनी याच कालावधीत चांगलं भांडवल उभं केलं आहे. सरकारी आकड्यांनुसार, या क्षेत्रातली स्टार्टअपमध्ये असलेली उलाढाल 600 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. म्हणजे इतकं भांडवल अॅग्रीटेक कंपन्यांनी मागच्या वर्षभरात उभं केलं आहे.       

पण, या क्षेत्रातल्या बहुतेक कंपन्या या छोट्या आकाराच्या आहेत. आणि अनेक ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे या स्टार्टअपनी अजून युनिकॉर्न (Unicorns) म्हणून नाव मिळवलेलं नाही . युनिकॉर्न म्हणजे ज्या कंपन्यांचं मूल्य 1 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशी स्टार्टअप कंपनी.       

सध्या भारतात तशी एकही अॅग्रीटेक कंपनी नसली तरी येणाऱ्या पाच वर्षांमध्ये परिस्थिती बदलेल, असं आघाडीची गुंतवणूक बँक अॅव्हेंजस कॅपिटलने आपल्या अहवालात म्हटलं आहे. भारतातल्या अॅग्रीटेक कंपन्यांचा एकत्र वृद्धीदर येणाऱ्या काही वर्षांमध्ये 50%च्या वर असेल. आणि त्यामुळे 2027 पर्यंत या कंपन्यांचं एकत्रित मूल्य 34 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं असेल, असं या अहवालात नमूद करण्यात आलंय.       

‘देशाच्या जीडीपीमध्ये कृषिक्षेत्राचा वाटा 530 अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे. पण, शेतीतली उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणं, पुरवठा साखळी निर्माण करणं, उत्पादनं बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याची साधनं विकसित करणं, मालाचा दर्जा राखणारी यंत्रणा उभी करणं, कृषि क्षेत्रातले व्यवहार डिजिटल माध्यमातून होणं असा कितीतरी गोष्टींमध्ये कंपन्यांना नवं काहीतरी करण्याची संधी आहे. आणि अशा कंपन्या फक्त भारतालाच नाही तर भारताकडून जगाला सेवा देऊ शकतात,’ असं अॅव्हेंजस कॅपिटलचे कार्यकारी संचालक पंकज नाईक यांनी म्हटलं आहे.       

देशातल्या पाच ते सहा अॅग्रीटेक कंपन्या त्यांच्या इनिशिअर पब्लिक ऑफर आणण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच 3 ते 5 वर्षांत त्यांची शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. ते झालं की, त्यांचं मूल्यही वाढेल. आणि तो अंदाज बांधून कंपनीने आपला आताचा अहवाल तयार केला आहे.