केंद्र सरकारने सैनिक भरतीच्या पार्श्वभूमीवर आणलेली अग्निपथ योजनेच्या (Agneepath Scheme Indian Army) विरोधात उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश तसेच दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांना उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये हिंसक वळण लागून अनेक ठिकाणी सार्वजनिक बस आणि रेल्वे गाड्या जाळण्यात आल्या. तसेच सार्वजनिक मालमत्तेची तोडफड करण्यात आली. या हिंसक आंदोलनात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमामात नुकसान झाले. रेल्वे गाड्यांना लावलेल्या आगीत काही डबे जळून खाक झाले तर या आंदोलनामुळे 300 हून रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे रेल्वे प्रशासनाचे 50 कोटी रूपयांहून अधिक रकमेचे आर्थिक नुकसान झाले.
अग्निपथ योजनेच्या विरोधात तरूणांनी विरोध दर्शवत उत्तर भारतात हिंसक निदर्शने केली आहेत. या हिंसक निदर्शनात अनेक ठिकाणी गाड्या जाळण्यात आल्या. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. या विरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलत निषेधाच्या नावाखाली सरकारी मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई वसूल करणार असल्याचे सांगितले. स्थानिक प्रशासनाने अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सहभागी झालेल्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली. ही ओळख परेड पूर्ण झाल्यानंतर प्रशासन नुकसान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आरोपींकडून वसूल करणार आहे.
रेल्वे प्रशासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान
रेल्वेच्या एका बोगीची किंमत सुमारे 2 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते. या हिंसक आंदोलनात अंदाजित 25 ते 30 बोगींचे नुकसान झाले. म्हणजे सुमारे 50 ते 60 कोटी रूपयांचे नुकसान फक्त बोगीच्या माध्यमातून झाले आहे. याशिवाय रेल्वे प्रशासनाला अनेक रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागल्या. याचाही रेल्वे प्रशासनाला भुर्दंड पडला. त्यामुळे एकूणच या हिंसक आंदोलनामुळे रेल्वेचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
उत्तर भारतातील स्थानिक वर्तमानपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1.5 लाख प्रवाशांना या आंदोलनामुळे रेल्वेचा प्रवास अर्ध्यावर सोडावा लागला. तसेच 5 लाखापेक्षा अधिक पीएनआर रद्द करावे लागले. तर 7 कोटी रूपये रिफंड म्हणून परत द्यावे लागले. या आंदोलनामुळे पूर्व-मध्य रेल्वे विभागातील मालमत्तेच्या नुकसानामुळे सुमारे 241 कोटी रूपयांचे नुकसान झाले. देशभरातील 922 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. याचेही नुकसान रेल्वे प्रशासनाला भोगावं लागणार आहे.
वाराणसी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनात 36 बसचे नुकसान झाले. तर सार्वजनिक मालमत्तेचे एकूण 12.97 लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी 27 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसक निदर्शनामध्ये सहभागी झालेल्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर लवकरच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बिहारमध्ये ही अग्निपथ योजनेच्या विरोधात निषेध करणाऱ्या आंदोलकांनी दोन पोलीस व्हॅन, सात चारचाकी वाहनांसह 50 हून अधिक वाहनं जाळली. तसेच बिहारमधील 27 रेल्वे स्थानकांवर ही धुडगूस घालण्यात आला. काही ठिकाणी तर रेल्वे तिकीट ऑफिसमधून पैसेही लुटण्यात आले.
अशाप्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि संबंधित आंदोलकांच्या अशा हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा आहे. या कायद्यानुसार सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून नुकसानीची रक्कम वसूल करण्याची तरतूद आहे.
image source - https://bit.ly/3xNilpX