महाराष्ट्र दिन एका दिवसावर येवून ठेपलाय. त्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारनं आणखी एक सवलत जाहीर केलीय. मेट्रोनं (Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता 25 टक्के सवलतीसह प्रवास करता येणार आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या प्रकारातल्या अनेक प्रवाशांना ही सूट मिळणार असल्याचं राज्य सरकारचं मत आहे. मेट्रोच्या आधी एसटी प्रवाशांनाही सरकारनं सवलत जाहीर केली होती. त्यानुसार महिलांना एसटी प्रवास 50 टक्के सवलतीत मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवासात सूट आहे. दरम्यान, महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha Mumbai Metro Operation Corporation Limited) आणि एमएमआरडीए (Mumbai Metropolitan Region Development Authority) यांच्याकडून महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातल्या नागरिकांसाठी ही भेटच असणार आहे. यानुसार विद्यार्थी, दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांना मुंबई 1 पासवर 45 ट्रीप किंवा 60 ट्रीपची सवलत मिळणार आहे.
प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता जाहीर केली सूट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, की प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता सरकार सवलत जाहीर करतं. आम्ही लहान मुलं, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना समोर ठेवून ही सूट जाहीर केलीय. त्यामुळे प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलंय. याआधी सरकारनं महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट, ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास या सुविधा जाहीर केल्या होत्या. त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. एसटी आता अधिक भरून वाहू लागल्या आहेत. महिलांची अधिक संख्या एसटी बसमध्ये दिसून येतेय. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना आधी अर्ध तिकीट आकारलं जात होतं. आता 65 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. यासाठी वयाचा पुरावा संबंधितांना दाखवावा लागतो. आता मेट्रोलाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. १ मे, महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई वन) वापरणाऱ्या या श्रेणीतील… pic.twitter.com/1vI7UHrezc
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 29, 2023
कागदपत्रे गरजेची
मेट्रोच्या या सवलतीबद्दल एकनाथ शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितलं, की मेट्रोची ही सुविधा 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक, 12वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी तसंच कायमस्वरुपी अपंग असलेल्या प्रवाशांसाठी असणार आहे. या तिनही प्रकारचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना काही कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांनी सरकारी/वैद्यकीय संस्थेचं प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांनी वयाचा पुरावा तर विद्यार्थ्यांनी पॅनकार्ड (विद्यार्थी किंवा पालकांचे पॅन) सोबतच शालेय ओळखपत्र यासारखी काही महत्त्वाची आणि वैध कागदपत्रं सादर करावी.
30 दिवसांची वैधता
वरील सर्व कागदपत्रे गरजेची आहेत. ही कागदपत्रे दाखवून मेट्रो लाइन 2A आणि 7 वरच्या कोणत्याही तिकीट काउंटरवर तुम्हाला या सर्व सवलतींचा लाभ घेता येणार आहे. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवरदेखील ही सवलत दिली जाणार आहे. ही सवलत 30 दिवसांसाठी वैध असणार आहे. किरकोळ दुकाने, पेट्रोल पंप आणि बेस्ट बसमध्ये प्रवास करताना मुंबई 1 कार्ड वापरलं तसंच रिचार्ज केलं जाऊ शकतं.