निवृत्तीनंतर आयुष्यातील एक वेगळा टप्पा सुरू होतो. आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींसह करिअरच्याबाबतीत ही निवृत्तीनंतरचा कालावधी वेगळा असतो. सर्वसाधारणपणे वयाच्या 60 ते 65 वर्षापर्यंत अनेकजण काम करतात. काहीजण नोकरीतून निवृत्त घेतल्यानंतर कोणतेही काम करत नाहीत. मात्र, काहीजण वयाची साठी ओलांडल्यानंतरही नवीन काहीतरी शिकण्यात, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याला प्राधान्य देतात.
निवृत्तीनंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करताना मागील अनेकवर्ष केलेल्या कामाचाही फायदा मिळतो. या लेखातून तुम्ही वर्षांनुवर्ष केलेल्या कामाचा निवृत्तीनंतरच्या आयुष्यात कसा फायदा होऊ शकतो, याविषयी जाणून घेऊयात.
निवृत्तीनंतर काय करणार?
वयाच्या 60 अथवा 70व्या वर्षी निवृत्ती घेतल्यानंतरही अनेकांची काम करण्याची इच्छा असते. करिअरमध्ये अचानक झालेला बदल आव्हानात्मक ठरू शकतो. मात्र, गेली 30-40 वर्ष केलेल्या कामाचा अनुभव असल्याने निवृत्तीनंतरही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे शक्य असते. आधीचे काम करताना मिळालेल्या अनुभवाचा व कौशल्याचा वापर नवीन काम करताना होईल. तुमच्या कौशल्याचा वापर करून स्वतःच्या व्यवसायात यश मिळवू शकता.
स्वतःची कौशल्ये ओळखा
कामाची यादी बनवा | स्वतःमधील कौशल्ये ओळखण्यासाठी तुम्ही गेली अनेकवर्ष केलेल्या कामाची यादी बनवणे गरजेचे आहे. मागील 30 ते 40 वर्ष तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये अनेक पदांवर काम केले असेल. या पदांवर काम करताना कोणत्या कौशल्यांचा फायदा झाला त्याची यादी बनवा. |
कौशल्ये ओळखा | निवृत्तीपूर्वी काम करताना अनेक नवीन गोष्टी शिकला असाल. ही कामे करताना संवाद, नेतृत्व क्षमता, व्यवस्थापन, टीमवर्क व इतर तांत्रिक कौशल्यचा नक्कीच वापर केला असेल. स्वतःमधील अशी कौशल्ये ओळखल्यास निवृत्तीनंतर इतर कामे करताना अथवा व्यवसाय सुरू करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. |
कामगिरी | नोकरीच्या काळात तुम्ही केलेली कामगिरी अधोरेखित करणे गरजेचे आहे. तुम्ही काम करत असलेल्या प्रोजेक्टमध्ये मिळालेले यश, कंपनीच्या वस्तूंच्या विक्रीत झालेली वाढ अथवा कंपनीचा फायदा होईल यासाठी उचललेले पाऊल, अशा गोष्टी अधोरेखित करा. ज्यामुळे निवृत्तीनंतर सुरू करत असलेल्या करिअरच्या नवीन टप्प्यात फायदा मिळेल. |
निवृत्तीनंतर कोणत्या कामात कौशल्याचा फायदा होईल?
नवीन नोकरीसाठी होईल फायदा - तुम्ही जर निवृत्तीनंतरही नवीन क्षेत्रात अथवा पार्ट टाईम नोकरीचा विचार करत असाल तर, आधीच्या अनुभवाचा व कौशल्याचा नक्कीच फायदा होईल. विशेष म्हणजे तुमच्या अनुभवाच्या जोरावर नोकरी मिळण्यास मदत होईल.
संवाद कौशल्याचा वापर कॉन्टेंट क्रिएटशन, जनसंपर्क क्षेत्राशी संबंधित कामासाठी करू शकता. व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्याचा वापर ऑनलाइन व्यवसाय, रिअल इस्टेट क्षेत्रात, तांत्रिक कौशल्याचा वापर ई-कॉमर्स व्यवसाय, टेक सपोर्ट सारख्या कामामध्ये होईल. याशिवाय, तुम्ही कौशल्याच्या मदतीने आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात देखील काम करू शकता.
व्यवसायात होईल मदत – निवृत्तीनंतर अनेकजण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात. व्यवसाय सुरू करण्यात व यात यश मिळवण्यासाठीही तुमची कौशल्ये उपयोगी येतील. संवादांपासून ते नेवृत्वापर्यंत, व्यवसायासाठी प्रत्येक कौशल्ये तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. काम करताना मिळालेल्या अनुभवाचा व कौशल्यांचा वापर केल्यास व्यवसायात नक्कीत यश मिळेल.