रिझर्व्ह बॅंक इंडियाने वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी बुधवारी (दि. 7 डिसेंबर) पुन्हा एकदा रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे आरबीआयचा रेपो दर (Repo Rate) 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे लगेचच देशातील सार्वजनिक आणि खाजगी बॅंकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.
बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बॅंकेने आरबीआयच्या रेपो दरवाढीनंतर लगेचच कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ केली.
Table of contents [Show]
बॅंक ऑफ बडोदाने रेपो दराच्या वाढीनंतर लगेचच आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली. नवीन दरवाढ 1 ऑक्टोबर, 2022 पासून लागू करण्यात आली. बॅंकेने त्यानुसार वेबसाईटवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.25 टक्के केल्यानंतर बडोदा बॅंकेने रिटेल लोनचा दर (Baroda Repo Linked Lending Rate-BRLLR) 8.85 टक्के केला आहे.
बॅंक ऑफ इंडिया (Bank of India)
बॅंक ऑफ इंडियाने वेबसाईटवर प्रसिद्ध केल्याप्रमाणे, नवीन रेट 9.10 टक्के असणार आहे आणि हा दर बुधवारपासून (दि.7 डिसेंबर) लागू झाला आहे. बॅंक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस लेंडिंग रेट (Marginal Cost of Funds based Lending Rate-MCLR) 25 बीपीएस पॉईंटने वाढवला आहे. त्याचबरोबर बॅंक ऑफ इंडियाने एका वर्षाचा एमसीएलआर 7.95 टक्क्यांवरून 8.15 टक्के केला आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर 7.65 वरून 7.90 टक्के केला आहे आणि हे दर 1 डिसेंबर, 2022 पासून लागू करण्यात आले.
इंडियन ओव्हरसीज बॅंक (Indian Overseas Bank)
इंडियन ओव्हरसीज बॅंकेने सर्व प्रकारच्या कालावधीतील एमसीएलआरच्या दरामध्ये 15 ते 35 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. तर बॅंकेने रेपो लिंक लोन रेट (Repo Linked Loan Rate - RLLR) 9.107 टक्के केला असून तो 10 डिसेंबर, 2022 पासून लागू होईल.
व्याजदरात वाढ झाल्याने ईएमआय वाढणार!
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने त्याचा परिणाम कर्जदारांच्या ईएमआयवर होणार आहे. आरबीआयच्या दरवाढीनंतर काही बॅंकांनी लगेच कर्जाच्या व्याजदरात वाढ केली. यामुळे होम लोन घेतलेल्या ग्राहकांच्या खिशाला ईएमआय वाढल्यामुळे फोडणी बसणार आहे. तर काही कर्जदारांचा कर्जाचा कालावधी वाढू शकतो. नव्याने कर्ज घेणाऱ्या कर्जदारांनी फिक्सड किंवा फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले तरी त्यांना जास्तीचा ईएमआय भरावा लागणार आहे.