Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WHO Alert Over Indian Syrup : डब्ल्यूएचओच्या सतर्कतेनंतर सीडीएससीओनंही कफ सिरप दूषित असल्याचं केलं मान्य

WHO Alert Over Indian Syrup : डब्ल्यूएचओच्या सतर्कतेनंतर सीडीएससीओनंही कफ सिरप दूषित असल्याचं केलं मान्य

WHO Alert Over Indian Syrup : भारतात बनवल्या जाणाऱ्या एका कफ सिरपमध्ये धोकादायक तत्व असल्याचं आता सीडीएससीओनंही (Central Drugs Standard Control Organisation) मान्य केलंय. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं भारतातल्या या कफ सिरपविषयी अलर्ट जारी केला होता. त्यानंतर आता सीडीएससीओच्या तपासातही ही बाब अधोरेखित झालीय.

पंजाबच्या डेराबस्सीमध्ये तयार होत असलेल्या कफ सिरपच्या वापरासंबंधी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (WHO) अलर्ट जारी केला होता. आता त्याच्या एका आठवड्यानंतर संबंधित औषधामध्ये विषारी दूषित पदार्थ आढळल्याचं स्पष्ट झालंय. डायथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol) आणि इथिलीन ग्लायकोलचं (Ethylene Glycol) प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचं सीडीएससीओच्या तपासणीत समोर आलंय. फायनान्शिअल एक्स्प्रेसनं यासंबंधीचं वृत्त दिलंय.

कंपनीचा परवाना रद्द

हिमाचल प्रदेशातल्या बद्दी याठिकाणी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं (CDSCO) या कफ सिरपमध्ये विषारी दूषित पदार्थ असल्याचं मान्य केलंय. यासंबंधीच्या एका रिपोर्टनुसार सध्या तपास सुरू आहे. भारताचे ड्रग्स कंट्रोलर जनरल (DCGI) यांना या संपूर्ण केसची माहिती देण्यात आलीय. पंजाबच्या क्यूपी फार्माकेम लिमिटेडनं संबंधित औषध तयार केलंय तर हरयाणाच्या ट्रिलियन फार्मा या कंपनीच्या माध्यमातून त्याची विक्री होत आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, सीडीएससीओने कफ सिरप निकृष्ट असल्याचं मान्य केलंय. संबंधित प्रकरणी कारवाईदेखील करण्यात आलीय. पंजाबच्या एफडीएनं द्रव औषधांसाठी उत्पादकाचा परवाना रद्द केलाय.

धोकादायक तत्व प्रमाणापेक्षा अधिक

ग्वायफेनेसिन (GUAIFENESIN SYRUP TG SYRUP) हे ते औषध आहे, ज्यावर डब्ल्यूएचओनं आक्षेप घेतला होता. हे एक छातीतला कफ बाहेर काढणारं औषध आहे. त्याचप्रमाणं तेथला रक्तसंचय सुरळीत करण्याच्या कामी याचा उपयोग होतो. मात्र यात अनेक धोकादायक तत्व प्रमाणापेक्षा अधिक वापरल्याचं डब्ल्यूएचओचं म्हणणं होतं. मार्शल आयलंडमधल्या ग्वायफेनेसिन सिरप टीजी सिरपचे नमुने ऑस्ट्रेलियाच्या थेरप्यूटिक गुड्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या (टीजीए) गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी तपासले होते. त्यावेळी संबंधित उत्पादनात डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोल हे दूषित पदार्थ अधिक प्रमाणात आढळून आले होते. यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील एक अलर्ट जारी केला होता.

ऑस्ट्रेलियातल्या तपासणीनंतर डब्ल्यूएचओचा अलर्ट

डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचं सेवन मानवांसाठी अत्यंत घातक आहे. यामुळे मनुष्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो, त्याचप्रमाणे गंभीर इजा होण्याचाही धोका कायम राहतो. त्यामुळे संघटनेनं एक अलर्ट जारी केला. संबंधित उत्पादन हे अत्यंत दूषित आणि असुरक्षित आहे. सर्वसामान्य व्यक्ती त्यातही लहान मुलांमध्ये त्याचा वापर घातक ठरू शकतो. यामुळे ओटीपोटात दुखणं, उलट्या, अतिसार, लघवी करताना त्रास, डोकेदुखी, मानसिक स्थितीमध्ये बदल, किडनीला इजा असे घातक परिणाम या औषधांमुळे होऊ शकतात. याशिवाय मृत्यूदेखील होऊ शकतं, असं आपल्या अलर्टमध्ये डब्ल्यूएचओनं म्हटलं होतं. मायक्रोनेशिया आणि मार्शल आयलंड्समधल्या कफ सिरपचे नमुने ऑस्ट्रेलियातल्या थेरप्युटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशनच्या (TGA) गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेद्वारे तपासण्याच आले. त्याचा जो चाचणी अहवाल आला त्यानंतरच डब्ल्यूओचओचा हा इशारा समोर आला.

वापरण्यास हिरवा झेंडा, मात्र...

डब्ल्यूएचओनं हे उत्पादन वापरण्यास परवानगी दिली होती. या उत्पादनास पश्चिम पॅसेफिक प्रदेश त्याचप्रमाणं इतर देशांमध्ये वितरित करता येईल. त्याचबरोबर अनौपचारिकरित्या इतर देश आणि प्रदेशांमध्येही याचं वितरण होऊ शकतं, असं त्यावेळच्या अलर्टमध्ये म्हटलं होतं. कंपनीनं याचं स्पष्टीकरण देताना डुप्लिकेट औषध असल्याचं म्हणत कंपनीची बदनामी करण्याचा हेतू असल्याचं म्हटलं होतं. आता मात्र भारतातल्या या औषधासंबंधी अधिकच्या तपासणीनंतर कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलाय.