शेअर बाजारात अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत असून कंपनीच्या शेअरमध्ये आज पुन्हा एकदा अपर सर्किट लगले आहे. आज अदानी पॉवरच्या एका शेअरची किंमत 196.05 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी कंपनीसंदर्भात मंगळवारी एक सकारात्मक बातमी आली होती.याविषयी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, अदानी पॉवरमध्ये 6 कंपन्यांचे मर्जर झाले असून यामध्ये अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड, अदानी पॉवर राजस्थान लिमिटेड, उड्डपी पॉवर कॉरपोरेशन लिमिटेड, रायपूर एनर्जी लिमिटेड, रायगढ एनर्जी जनरेशन लिमिटेड आणि अदानी पॉवर (मुंद्रा) लिमिटेडचा यात समावेश आहे. या सर्व कंपन्या समूहाच्या सब्सिडरी कंपन्या आहेत.
गेले 10 दिवस वारंवार लागतेय अप्पर सर्किट
गेले 10 दिवस वारंवार अप्पर सर्किट लागत आहे. कंपनीचे शेअर्स अपर सर्किटवर असण्याचा शेअर बाजारातील आजचा 7 वा दिवस असून 27 फेब्रुवारीपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आलेली आहे. गेल्या महिनाभरातील अनेक चढ-उतारांदरम्यान कंपनीच्या शेअरचा भाव 13.09 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र असे असले तरी 6 महिन्यांपूर्वी अदानी पॉवरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. सरलेल्या सप्ताहातील सकारात्मक घडामोडी अदानी समुहातील कंपन्यांतील भागधारकांसाठी चांगल्या ठरल्या आहेत. भांडवली बाजारात समुहातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग सलग सहाव्या सत्रात तेजीत राहिले असून भांडवली बाजारात अस्थिर वातावरण असूनही गेल्या सहा सत्रांत अदानी समुहातील कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकत्रित 2.2 लाख कोटी रुपयांहून अधिक भर पडली आहे.
अदानी पॉवर, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मर या कंपन्यांच्या समभागात बुधवारच्या सत्रात प्रत्येकी पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून सोमवारच्या सत्रात अदानी समुहातील कंपन्यांच्या बाजार भांडवलात 17 हजार कोटींची भर पडली होती. परिणामत: आता अदानी समुहाचे बाजार भांडवल 9 लाख कोटी रुपयांपुढे पोहोचले आहे. चालू वर्षात जानेवारी महिन्यात अमेरिकी संस्था हिंडेनबर्गने अदानी समुहावर केलेल्या आरोपांमुळे समुहातील काही कंपन्यांच्या समभागांमध्ये 80 टक्क्यांपर्यंत घसरणीला सामोरे जावे लागले होते.
या तेजीची कारणे काय आहेत?
अमेरिकी कंपनी जीक्यूजी पार्टनर्सने अदानी समुहातील चार कंपन्यांच्या समभागांमध्ये सुमारे 15 हजार 446 कोटी रुपयांनी खरेदी केली आहे. अदानी समुहातील अदानी पोर्ट्स आणि एसईझेड, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेसमधील सुमारे 17.2 कोटी समभाग बाजारात एकगठ्ठा व्यवहाराच्या माध्यमातून खरेदी केले आहेत. तसेच, जीक्यूजी पार्टनर्सकडून अदानी समुहामध्ये आणखी गुंतवणूक वाढवली जाण्याची शक्यता आहे. Adani group ने समभाग तारण ठेवून घेतलेल्या 7 हजार 347 कोटी रुपयांच्या (90.11कोटी डॉलर) कर्जाची मुदतपूर्व परतफेड केली असून यामुळे समुहातील सूचिबद्ध कंपन्यांवरील कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल.
अदानी समुहाने संपादित केलेली सीमेंट कंपनी ‘एसीसी’चे नोंदणीकृत कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या एसीसीचे नोंदणीकृत कार्यालय सिमेंट हाऊस, 121, महर्षी कर्वे रोड, मुंबई येथे असून आता हे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थानांतरित होत आहे. यासाठी 14 डिसेंबर 2022 रोजी टपाली मतदानाच्या माध्यमातून विशेष ठरावाला भागधारकांची मंजुरी मिळविली गेली आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी कंपनीने ‘नमुना आयएनसी 26’ प्रमाणे जाहिरात देऊन, स्थानांतरणावर सार्वजनिकरित्या हरकती मागवल्या असून त्यासाठी 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर एसीसीचे नोंदणीकृत कार्यालय गुजरातमध्ये हलवण्याचा कंपनीचा मार्ग मोकळा होईल. अशी काही या तेजीची कारणे विश्लेषकांकडून सांगितली जात आहेत.