Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 180 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या पुलाच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच ही दुर्घटना Act of God आहे की, Act of Fraud आहे; यावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पण यातील एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे अशा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना इन्श्युरन्स कंपन्यांकडून नुकसान भरपाई / इन्शुरन्स (Insurance) मिळतो का? आणि अशा सार्वजनिक दुर्घटनांमधील व्यक्तींना इन्शुरन्स कंपन्या कशाप्रकारे नुकसान भरपाई देतात. तसेच इन्शुरन्स कायद्यात Act of God हा नेमका काय आहे. याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.
“Floods are acts of God, but flood losses are largely acts of man” अर्थात पूरासारख्या घटना जरी “दैवी कृत्य” असली, तरीदेखील त्यामधून होणाऱ्या नुकसान, हानीला मात्र मनुष्यच जबाबदार असतो. निसर्गावरील मानवी अधिवासाच्या बेलगाम अतिक्रमणावर भाष्य करणारी quote आहे ही. परंतु मानवी हव्यासाच्या परिणामांची तीव्रता वाढविणारे उत्तराखंडातील जलप्रलयासारखे संकट असो किंवा नुकतीच गुजरातमधील मोरबी पूल कोसळून झालेली दुर्घटना असो, अशा दुर्घटना तुमच्या वाट्याला आल्या तर काय? त्यामुळे इन्शुरन्स कायद्यातील काही संकल्पनांचा, तरतुदींचा अर्थ जाणून घेणार आहोत.
“ॲक्ट ऑफ गॉड” या संकल्पनेची व्याख्या करायची झाल्यास “मानवी क्षमतेच्या बाहेरील आणि त्याच्या नियंत्रणाबाहेर उद्भवलेले संकट,” अशी करता येईल. इन्शुरन्सचे कायदे आणि भारतीय करार कायद्यांतर्गत (Indian Contract Act) Act of God ही महत्त्वाची तरतूद मानली जाते. कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी हा इन्शुरन्स कंपनी आणि पॉलिसीधारक यांच्यामधला एक कायदेशीर करारच असतो आणि या करारामध्ये, मानवी नियंत्रणाबाहेर असणाऱ्या घटनांचा संदर्भ देताना इन्शुरन्स कंपनीज् वेळोवेळी “ॲक्ट गॉड” किंवा “Vis Major” या तरतुदींचा (क्लॉजचा) उल्लेख करतात. Vis Major ही एक लॅटिन संकल्पना असून तिचा अर्थ “श्रेष्ठ शक्ती” (Superior Force) आहे. मानवी शक्तीच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या भूकंप, चक्रीवादळे, भूस्खलन (Landslide), महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तींचा समावेश या क्लॉजच्या अंतर्गत होतो. अपवादात्मक स्थितीमध्ये युद्ध, दंगल, हल्ला (strike) यांचा देखील समावेश होतो.
साधारणतः लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) आणि मालमत्ता (property) इन्शुरन्स तसेच मोटार इन्शुरन्स कंपनीज् वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीची, योग्य पुराव्यासह नुकसान भरपाई करतात. उदाहरणार्थ - एखाद्या पॉलिसीधारकावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला तर लाईफ इन्शुरन्स कंपनी मृत्यूचा दावा योग्यप्रकारे सिद्ध झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देते. तसेच पूर, चक्रीवादळे, भूकंपामुळे वाहनांचे नुकसान झाल्यास जनरल इन्शुरन्स कंपनीज् पॉलिसीधारकाला सदर घटनेची शहानिशा करून होईल तितकी नुकसानभरपाई देण्याचे प्रयत्न करते.
“ॲक्ट ऑफ गॉड” या क्लॉजच्या अंतर्गत समाविष्ट केलेले धोके पॉलिसी डॉक्युमेन्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असतात. याचे एखादे उदाहरण द्यायचे झाले तर, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे होणारे नुकसान भारतातील इन्शुरन्स कंपनींच्या “ॲक्ट ऑफ गॉड” संबंधीच्या धोरणांमध्ये अंतर्भूत नाही. परंतु इंडोनेशियासारख्या ज्वालामुखीय बेटांनी बनलेल्या देशांकरीता (Volcanic Archipelago) धोरणांमध्ये समाविष्ट आहे. पॉलिसीधारक देखील तो राहत असलेल्या भौगोलिक स्थानानुसार असलेल्या जोखमीसाठी संरक्षण निवडू शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर, पर्वतीय प्रदेशात राहणारी व्यक्ती चक्रीवादळे किंवा पुरासाठीचे संरक्षण न घेणे, निवडू शकतो.
लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींसोबत तुलना केल्यास “ॲक्ट ऑफ गॉड” परिस्थितींतर्गत आलेल्या क्लेम-सेटलमेंटची प्रक्रिया सुलभ असते. कारण अशा आपत्तींमध्ये दस्तऐवजांची आवश्यकता तुलनात्मकदृष्ट्या शिथिल केली जाते. पॉलिसीधारकांना केवळ इन्शुरन्स कंपनींना झालेल्या नुकसानाची माहिती द्यावी लागते. इन्शुरन्स कंपनीज् परिस्थितीचे आणि झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन करण्याकरीता आपले सर्वेक्षक (Surveyor) नेमतात. आणि झालेल्या हानीचे कारण “ऍक्ट ऑफ गॉड”चे अंतर्गत येत असल्याने इन्शुरन्स कंपनीज् त्वरित निकालात काढण्यासाठी प्रयत्नशील असतात.
मात्र पॉलिसीधारकांकडून देखील इन्शुरन्स कंपनींना जबाबदारीचे वर्तन अपेक्षित असते. केवळ आपला किंवा मालमत्तेचा विमा उतरविला आहे, या समजुतीने पॉलिसीधारकांकडून निष्काळजीपणाचे गंभीर वर्तन वारंवार केल्याचे आढळून आले, तर अशा प्रकरणांमध्ये पॉलिसी रद्द करण्याच्या किंवा संरक्षण नाकारण्याच्या अटीशर्तींची तरतूद इन्शुरन्स कंपनीज् करु शकतात. उदाहरणार्थ, प्रॉपर्टी इन्शुरन्स (मालमत्ता विमा) अंतर्गत शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीमुळे झालेले नुकसान इन्शुरन्स कंपनी कव्हर करेल. मात्र आग पॉलिसीधारकाच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या निष्काळजीपणामुळे लागली असल्यास कंपनी तो दावा (क्लेम) नाकारू शकते. मोटार इन्शुरन्स आहे म्हणून बेदरकारपणे ड्रायव्हिंग केल्याने झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी नाकारू शकते.