• 06 Jun, 2023 17:34

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Integrated IT portal: शेअर आणि लाभांशाचे करोडो रुपये पडून, पोर्टलच्या माध्यमातून करता येणार दावा

IT Portal

यंदाच्या अर्थसंकल्पात Investor Education and Protection Fund (IEPF)साठी एकात्मिक IT पोर्टल सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. याद्वारे ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक तर केली परंतु त्यांच्या मालकीच्या शेअरवर किंवा त्यावर मिळालेल्या लाभांशावर दावा केला नाही, अशांना दावा करणे सोपे होणार आहे...

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात शेअर्स आणि लाभांश मिळवण्यासाठी शेअर धारकांनी किंवा त्यांच्या वारसांनी कुठलाही दावा केलेला नाही. याबाबतची प्रक्रिया सोपी आणि सुलभ व्हावी यासाठी आयकर विभागाने एक नवी मोहीम हाती घेतली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात इन्वेस्टर एजुकेशन एंड प्रोटेक्शन फंड (IEPF) साठी एकात्मिक IT पोर्टल सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. याद्वारे ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक तर केली परंतु त्यांच्या मालकीच्या शेअरवर किंवा त्यावर मिळालेल्या लाभांशावर दावा केला नाही, अशांना आता त्यांच्या हक्काच्या पैशांवर दावा करणे सोपे होणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शी होतील आणि नागरिकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळतील असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार  5,685 कोटी रुपयांचा दावा न केलेला लाभांश सूचिबद्ध कंपन्यांच्या निदर्शनास आले आहेत. त्याचप्रमाणे 117 कोटी रुपयांचे दावे न केलेले शेअर्स IEPF मध्ये हस्तांतरित करण्यात आले आहेत. सध्याच्या बाजारभावानुसार आज त्यांची किंमत सुमारे 50,000 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे.

दावा न केलेले शेअर्स आणि लाभांश म्हणजे काय?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असे कोणते गुंतवणुकदार असतील जे त्यांच्या शेअरवर किंवा लाभांशावर दावा करत नसतील? परंतु अशी काही प्रकरणे अर्थमंत्रालयाच्या निदर्शनास आली होती. शेअर बाजारात अशा काही कंपन्या आहेत ज्या वेळोवेळी त्यांच्या नफ्यातील हिस्सा त्यांच्या शेअरधारकांना देत असतात.नफ्याच्या स्वरूपात मिळालेल्या या भागाला लाभांश म्हणतात.

या लाभांशावर शेअर होल्डरकडून सात वर्षांपर्यंत दावा केला जात नसेल तर ते अनक्लेम्ड सस्पेन्स खात्यात (Unclaimed Suspense Account) आणि नंतर IEPF खात्यात हस्तांतरित केले जातात. या पैशावर कुणीही दावा करत नसेल तर हे पैसे सरकारजमा होतात. गेल्या काही प्रकरणांमध्ये हे पैसे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा झालेले आहेत.

दावा न करण्याची प्रमुख कारणे

शेअर्स आणि लाभांशावर दावा न करण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही कारणे खालीलप्रमाणे. शेअरहोल्डरने कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्याचा पत्ता अपडेट न करणे, बँक खात्याची माहिती पूर्ण आणि अचूक न देणे, शेअरहोल्डरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारशांना शेअर किंवा लाभांशाबद्दल माहिती नसणे, शेअर सर्टिफिकेट हरवणे तसेच नावामध्ये बदल केला गेल्यास खातेदाराची पुष्टी न होणे. अशाप्रकारची अनेक कारणे यामागे आहेत.

सध्या काय आहे प्रक्रिया?

सध्या IEPF मध्ये पडून असलेले शेअर्स आणि लाभांश मिळविण्यासाठी, दावेदारांना IEPF फॉर्म-5 भरून ऑनलाइन दावा करावा लागतो. त्यानंतर कागदपत्रांची हार्ड कॉपी संबंधित कंपनीच्या नोडल ऑफिसरकडे जमा करावी लागते. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कंपनी, तिचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (RTA) आणि IEPF  प्राधिकरणाचा पाठपुरावा दावेदाराला करावा लागतो, यात अनेक अडचणी येतात. कागदपत्रे, शेयर सर्टिफिकेट आदी गोष्टींच्या अनुपलब्धतेमुळे हक्काच्या पैशांवर नागरिकांना पाणी सोडावे लागते.

IEPF साठी एकात्मिक IT पोर्टल

IEPF साठी विकसित केलेल्या एकात्मिक IT पोर्टलमुळे एकाच क्लिकवर शेअर, लाभांश, दावेदार, त्यांचे वारसदार यांची माहिती नागरिकांना घेता येणार आहे. तसेच शअर असलेल्या कंपनीच्या नोडल ऑफिसरकडे,रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे जाण्याची देखील गरज उरणार नाही. गुंतवणूकदारांना त्यांच्या दाव्यांची आणि कंपन्यांची रिअल-टाइम स्थिती तपासण्यासाठी देखील या पोर्टलचा उपयोग होणार आहे.