नागरिकांना आशा होती कि घरगुती वापराच्या गॅसवर (LPG) सरकारकडून देण्यात येणारी सबसिडी आज ना उद्या मिळेल. पण सरकाने दि. 2 जून रोजी जाहीर केले की, उज्ज्वल योजनेंतर्गत नोंदणी केलेल्यानांच सबसिडी दिली जाणार आहे. उर्वरित सर्वसामान्यांना मात्र घरगुती गॅस बाजारभावानेच घ्यावा लागणार आहे. घरगुती गॅसच्या सतत वाढणाऱ्या किमती आणि इतर महागाईच्या काळात सरकारने सर्वसामान्यांना हा आणखी एक धक्का दिला आहे. अनेक नागरिक आज ना उद्या गॅस सबसिडी मिळेल या आशेवर होते. पण सरकारच्या या निर्णयाने सामान्यांच्या पदरी निराशा आली आहे.
उज्ज्वला लाभार्थ्यांना 803 रुपयांत गॅस सिलेंडर
पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी दि. 2 जून रोजी पत्रकार परिषदेत घेत सांगितले की, जून 2020 पासून घरगुती वापराच्या गॅसवर (LPG) कोणतेही अनुदान दिले जात नाही. तर 21 मे रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याची घोषणा लागू केली. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा करण्याबरोबरच, सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरासाठी 12 गॅस सिलिंडरवर प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. सध्या 14.2 किलो वजनाच्या घरगुती वापराच्या गॅस (LPG) सिलेंडरची किंमत 1,003 रुपये आहे. परंतु प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक सिलिंडरचे बुकिंग झाल्यानंतर सरकार 200 रुपये सबसिडी जमा करणार आहे. उज्ज्वला योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांसाठी एका घरगुती सिलिंडरची किंमत 803 रुपये असेल.
उज्ज्वला योजना काय आहे?
देशातील गरीब वर्गाला गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकारी एपीएल (Above Poverty Line) आणि बीपीएल (Below Poverty Line) कार्डधारकांना गॅस सिलिंडरची सुविधा मोफत मिळते. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही सरकारी योजना सुरु केली होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, सरकार दारिद्र रेषेखालील आणि एपीएल कार्डधारकांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाते. या योजनेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात 1,28,10,952 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर पहिल्या टप्प्यात 9,27,14,083 नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
वाढत्या महागाईत गरिबांसाठी ही योजना काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकेल. अजूनही जर तुम्ही गॅस जोडणी केली नसेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता.