रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या नोटा चलनातून बाद होणार असल्या तरी त्याची वैधानिक मान्यता मात्र कायम असणार आहे. येत्या 30 सप्टेंबर पर्यंत नागरिक त्यांच्याकडे असलेल्या 2 हजारांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बदलून घेऊ शकतात.
दरम्यान, आरबीआयने मंगळवारी सांगितले की, 31 जुलैपर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या एकूण नोटांपैकी 88 टक्के नोटा बँकांमध्ये परत जमा केल्या गेल्या आहेत. 31 जुलैपर्यंत बँकांमध्ये जमा झालेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 3.62 लाख कोटी रुपये असल्याचे देखील आरबीआयने स्पष्ट केले आहे. बदलून घेतलेल्या नोटा किंवा बँक खात्यात जमा केलेल्या नोटांचा तपशील देशभरातील बँकांनी RBI ला सादर केला आहे, त्याआधारे ही माहिती देण्यात आली आहे.
अजून किती नोटा बाकी?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार आतापर्यंत 88% नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. याचाच अर्थ 12% नोटा अजूनही व्यवहारात आहेत. या नोटांचे मूल्य 0.42 लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे देखील आरबीआयने म्हटले आहे.
किती जमा? कितींची बदली?
31 जुलैपर्यंत देशभरातील विविध बँकांमध्ये जमा झालेल्या 2000 रुपयांच्या नोटांचा तपशील सविस्तरपणे आरबीआयने दिला आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार जमा झालेल्या एकूण नोटांपैकी 87 टक्के नोटा ठेवींच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या आहेत. याचाच अर्थ नागरिकांनी त्यांच्या बँक खात्यात किंवा वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये पैशांचा भरणा करताना 2000 रुपयांच्या नोटांचा वापर केलाय. यासोबतच 13% नोटा नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन बदलून घेतल्या आहेत. या आकडेवारीचा विचार केला असता नोटांचा सर्वाधिक वापर हा ठेवींच्या स्वरूपात करण्याचा नागरिकांचा कल दिसतो आहे.
उरलेत केवळ 2 महिने!
येत्या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 च्या नोटा बँकांमध्ये जाऊन बसली करून घेता येणार आहेत किंवा बँक खात्यात जमा करता येणार आहे. याबाबत वेळोवेळी आरबीआयने नागरिकांना आणि बँकांना सूचना दिल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून न घेतल्यास नेमक काय होणार आहे याबाबत आरबीआयने काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. येत्या काही दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.