Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market rally: शेअर मार्केट अचानक तेजीत येण्यामागील 7 कारणे कोणती?

Share Market rally

भांडवली बाजारात मागील वर्षभरापासून चढउतार होत आहेत. जागतिक मंदी आणि महागाईमुळे शेअर मार्केट दिशाहीन असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी दोन्ही प्रमुख निर्देशांक खाली आले होते. मात्र, आज दिवसभर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. सेन्सेक्स 710 अंकानी वधारला. तर निफ्टी 18,250 अंकांच्या पुढे गेला.

भांडवली बाजारात मागील वर्षभरापासून चढउतार होत आहेत. जागतिक मंदी आणि महागाईमुळे शेअर मार्केट दिशाहीन असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक खाली आले होते. मात्र, आज बाजारात उत्साहाचे वातावरण होते. सेन्सेक्स 710 अंकानी वधारला. तर निफ्टी 18,250 अंकांच्या पुढे गेला. त्यामुळे आजचा दिवस बाजारासाठी खास ठरला.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सेन्सेक्स ऑल टाइम हाय 63,583 अंकांवर होता. इथून पुढे सेन्सेक्सला आता फक्त 1,800 अंकांची प्रगती करायची आहे. अशीच प्रगती होत राहीली तर शेअर मार्केट पुन्हा सुस्थितीत येऊ शकते. शेअर मार्केटमध्ये तेजी येण्यामागील सात प्रमुख कारणे पाहूया.

1)परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी (FII Buying)

अमेरिकेची फेडरल बँक यापुढे व्याजदर वाढ करणार नाही असा विश्वास परदेशी गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांचा पैसा भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. मागील सात दिवसांत FII ने भारतात 11,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. एप्रिलपासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षात परदेशी गुंतवणुकदारांनी 22,500 कोटी रुपये भारतीय बाजारात लावले. त्यातून सकारात्मक वातावरण तयार झाले.

2) जागतिक बाजारपेठ (Global markets)

शुक्रवारी एकाच दिवसात अमेरिकेतील भांडवली बाजार 1.65% टक्क्यांनी वाढला. त्याचा परिणाम आज दिसून आला. तसेच अमेरिकेतील बँकिंग संकट ओसरल्याचे संकेत मिळत आहेत. एप्रिल महिन्यात अमेरिकेची कर्मचारी भरतीबाबत आलेली आकडेवारी चांगली होती. 2,53,000 नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याने उद्योग व्यवसाय उभारी घेत असल्याचा अंदाज गुंतणूकदारांनी काढला.

3) क्रूड ऑइल दर (Crude oil rates)

जागतिक स्तरावरील कच्च्या तेलाचे खाली आलेले भाव बाजारासाठी सकारात्मक ठरत आहेत. सलग तिसऱ्या आठवड्यात ब्रेंट क्रूड ऑइलचे दर खाली आले. कच्च्या तेलाची मागणी येत्या काळात आणखी कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

4) तिमाही निकाल (Q4 Earnings trigger)

एप्रिल महिन्यात कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले. ऑटो आणि बँकिंग वित्त सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे निकाल सकारात्मक आले. विश्लेषकांनी वर्तवलेल्या सकारात्मक अंदजांपैकी 77% अनुमान खरे ठरले. ऑटो, बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी चांगली कामगिरी केल्याचा बाजारावर परिणाम झाला.

5) भारतीय भांडवली बाजाराचे मुल्यांकन (Attractive valuations)

निफ्टी पीई (Price–earnings ratio) मध्ये घट झाल्याने परदेशी गुंतवणुकदार भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. जानेवारीतील पीई रेशोच्या तुलनेत एप्रिलमध्ये तो आणखी खाली आला. बाजारातून नफा कमावण्यासाठी किती रक्कम गुंतवावी लागेल हे या रेशोमधून समजते. तो कमी झाला म्हणजेच गुंतवणूक करणे स्वस्त झाले असा अर्थ होतो.

6) भारतीय अर्थव्यवस्थेचे एकूण चित्र

पुढील दोन ते चार तिमाहीमध्ये भारतातील स्थानिक बाजारपेठ पूर्णपणे सुरळीत होईल असा अंदाज विश्लेषक वर्तवत आहेत. देशांतर्गत वस्तुंची मागणी वाढल्याने अर्थव्यवस्था पुन्हा सुधारेल, ही अपेक्षा आहे. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.

7) बँकिंग सेक्टरला अच्छे दिन

आज दिवसभरात शेअर मार्केटमध्ये जी प्रगती झाली त्यात प्रामुख्याने बँकिंग सेक्टर आघाडीवर होते. इंडसंड बँक, बजाज फायनान्स आणि बजाज फेन्सर्व्हचे शेअर्स 3 ते 4% वधारले. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी होम लोन या दोन कंपन्या विलीनीकरणाच्या मार्गावर आहेत. शुक्रवारी एचडीएफसीचे शेअर्स खाली आले होते, मात्र, आज शेअर्स वधारले. तसेच प्रमुख बँकांची कर्ज वितरणाची आकडेवारी चांगली असल्याने अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे सूचित होते.