• 04 Oct, 2022 15:55

नोकरी सांभाळून करता येणारे 5 व्यवसाय

small buisness

तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचा कल्पक वापर करून नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता.

सर्वसामान्य नागरिकांना वाटतं आपल्या कडे सगळं असावं. आपल्या कुटुंबाला कशाचीही कमी पडू नये. कुटुंबाला सगळ्या सोइ-सुविधा देण्यासाठी पैशाची गरज असते. यासाठी घरातील कमावती माणसं जिवापाड प्रयत्न करत असतात. पण वाढत्या महागाईसोबत (Inflation) सर्वसामान्यांचे पगार वाढत नाहीत. सर्वसामान्यांना घर चालवण्यासोबत कर्जाचे हफ्ते (Loan EMI) इत्यादी खर्च असतात. हे खर्च भागवण्यासाठी सर्वसामान्य नोकरीसोबतच जोड व्यवसाय (Side Business) सुरु करण्याच्या विचारात असतात. पण मार्गदर्शन किंवा त्या व्यवसायाची माहिती नसल्याने अनेक जण व्यवसायाचा विचार लांबणीवर टाकतात. कारण आपण करत असलेला व्यवसाय चालला नाहीतर नुकसान होईल या भीतीने व्यवसायात हात घालण्यास कचरतात. पण आपण आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून शून्य भांडवलावर (Zero capital) आपण लघु व्यवसाय सुरु करू शकता. कोणते 5 व्यवसाय करता येऊ शकतात याची माहिती घेऊया. 


रेफरल बिजनेस Referral business

रेफरल बिजनेसच्या माध्यमातून व्यावसायिक आणि ग्राहकाला जोडणारा दुवा म्हणून काम करू शकता. म्हणजे व्यावसायिकाचे एखादे प्रॉडक्ट तुम्ही ओळखीच्या किंवा गरज असलेल्या व्यक्तीला सुचवून त्याच्या मध्यस्थीतून कमिशन मिळवू शकता. हा व्यवसाय नोकरी करता-करता आरामात करू शकता. यासाठी तुमच्याकडे थोडेफार मार्केटिंग कौशल्य असणे गरजेचे आहे. 

कन्सल्टेशन Consultation

तुम्ही एखाद्या क्षेत्रातमध्ये एक्सपर्ट असाल तर त्या क्षेत्रासाठी तुम्ही कंसल्टेशनचा पार्ट टाईम व्यवसाय सुरु करू शकता. जर तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीचे ज्ञान असेल तर त्याबद्दल सल्ला देण्याचे काम तुम्ही करू शकता. सध्याच्या जीवन पद्धतीमध्ये अनेकांना अनेक प्रश्न पडलेले असतात. जसे कि चांगले पालक कसे बनायचे, रागावर नियंत्रण कसे मिळवायचे या विषयांवर तुम्ही काउंसलिंग करून कमाई करू शकता. तसेच यासंदर्भात सेमिनार किंवा आठवड्याचे वर्ग घेतले तरी त्यातून चांगली कमाई होऊ शकते. यासाठी फक्त दिवसाचे काही तास द्यावे लागतील. तसेच ऑनलाईन पद्धतीनेही तुम्ही हे काम करू शकता. 

ऑनलाईन प्रॉडक्ट विका Sell ​​products online

जर तुमचा हातात काही कलाकुसर असेल आणि फावल्या वेळात तुम्ही हा छंद जोपासत असाल तर तुम्ही तयार केलेल्या वस्तू विकून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तसेच या वस्तू अमेझॉन, ओएलएक्स वर विकू शकता. तसेच होलसेल मार्केट मधून वस्तू  खरेदीकरूनही तुम्ही विकू शकता. हे विकण्यासाठी दुकानाची गरज नाही. इंटरनेटच्या माध्यमातून हे विकून पैसे कमवू शकता. 

शिकवण्या घेता येतील Home Tuition

कधीही तोट्यात न जाणारा व्यवसाय म्हणजे शिकवण्या घेणे. फक्त या प्रकारात तुम्ही कोणत्या शिकवण्या घेत आहेत याची प्रसिद्धी करता आली पाहिजे. दिवसातील काही तास देऊन तुम्ही शिकवण्या हेऊ शकता. तसेच शिकवणीला किती प्रतिसाद मिळतोय आणि आर्थिक फायदा किती होतो हे बघून पूर्णवेळसाठीही या व्यवसायाचा विचार केला जाऊ शकतो. 

ऑनलाईन कोर्स विकणे Selling online course

कोरोनाने इंटरनेटचे महत्व जगाला पटवून दिले आहे. आपले कौशल्य कष्ट आहे हे हेरून तुम्ही वेगवेगळ्या विषयावर ऑनलाईन कोर्स बनवून विकू शकता. यात तुम्ही एखाद्या पाककृती, योगा किंवा कोणतेही ज्ञान जे आपल्याकडे आहे त्याची योग्य मांडणी करून सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना समजावू शकता. तसेच तयार केलेल्या कोर्सची जाहिरात तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकता.

हे काही मोजके पर्याय आम्ही तुमच्यासमोर ठेवले आहे. याहीपेक्षा वेगळ्या अनेक कल्पना आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही नोकरीसोबतच स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता.