भारतामध्ये मागील काही वर्षांमध्ये नवउद्योजकांची (Rural No suggestions) लाट आली आहे. शहरीच नाही तर ग्रामीण भागातील तरुण तरुणीही नोकरीची वाट सोडून उद्योजक व्हायंची स्वप्न पाहत आहे. अनेकांना यामध्ये यशही आलं आहे. उद्योजकांची फळी ही भविष्यात आणखी वाढेल अशी आशा दिसत आहे. ग्रामीण भागात राहणारे 44 टक्के तरुण स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतोय, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ह ग्रुप या संस्थेने "इनसाइट इंटू रुरल आंत्रप्युनिअरशिप' (Insights into Rural Entrepreneurship) नावाचा अहवाल सादर केला आहे. यातून ही माहिती समोर आली आहे.
हा अहवाल तयार करण्यासाठी सुमारे 5 हजार ग्रामीण भागातील उद्योग आणि तरुणांची मते जाणून घेण्यात आली. ग्रामीण भागीतील 2 हजार 41 उद्योग आणि 1 हजार 906 तरुणांना प्रश्न विचारून घेण्यात आले. त्यांच्या भविष्यातील योजना तसेच सध्या उद्योग सुरू करण्यासाठी येत असलेल्या अडचणी याद्वारे जाणून घेण्यात आल्या.
धोका पत्करण्याची तयारी (Youth are ready to take risk)
ग्रामीण भागातील तरुण फक्त ध्येय डोळ्यासमोर ठेवत नाहीतर धोका पत्करण्याची तयारीही त्यांनी ठेवली आहे. ग्रामीण भागात सुरु होणारे 10 पैकी 9 उद्योग हे नव्या पिढीकडून चालवण्यात येत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ह ग्रुपच्या उपाध्यक्षा कनिका वर्मा म्हणाल्या की, उद्योजक होण्याची उर्मी ग्रामीण भागीतील तरुणांमध्ये आहे. स्थानिक भागामध्ये असलेल्या संधी ओळखून त्यावर काम करण्यासाठी तरुणांना सहकार्य करण्यासाठी व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचेही वर्मा म्हणाल्या.
ग्रामीण उद्योजकांना कोणत्या अडचणी येतात? (Obstacles in front of rural entrepreneurs)
उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उभे करण्याची अडचण तसेच मनुष्यबळाची कमतरता या दोन मोठ्या अडचणी ग्रामीण भागातील उद्योजकांना आहेत. निम्म्य मनुष्यबळाची गरज ज्या ठिकाणी उद्योग सुरू करण्यात आला आहे तेथील स्थानिक गावातून भागवली जाते. फक्त 20 टक्के मनुष्यबळ बाहेरुन येवून काम करते. निधीच्या अभावामुळे उद्योगामध्ये वाढ करता येत नसल्याचे 40 टक्के व्यावसायिकांनी सांगितले.
तंत्रज्ञान वापरात ग्रामीण उद्योजक पडतायेत मागे (Rural businesses behind in use of technology)
ग्रामीण उद्योगांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खूपच कमी असल्याचेही पुढे आले आहे. सर्व्हे केलेल्या उद्योगांपैकी फक्त 11 टक्के उद्योगांनी व्यवसाय वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा वापर केला होता. तसेच विपणन म्हणजेच मार्केटिंग करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर फक्त 13.4 टक्के उद्योगांनी केला होता. तंत्रज्ञानाचा वापर जास्त झाला तर उद्योगांची कार्यक्षमता वाढेल तसेच मार्केटिंगद्वारे मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहचता येईल.