Sugarcane Cutting Machine Subsidy: ऊस हे भारतातील प्रमुख पीक आहे, ज्यासाठी देशभरातील अनेक शेतकरी वर्षभर मेहनत करतात. पण कापणीची वेळ आल्यावर शेतकऱ्यांची मेहनत वाढते, अनेक वेळा या कामासाठी चांगले मजूरही मिळत नाहीत आणि मिळाले तरी या कामाला बराच वेळ जातो. पण आता असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी यंत्राचा वापर करून आपले काम सोपे केले आहे. सरकारनं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येणार आहे.
मंजुरांची टंचाई भरून काढण्यासाठी ऊस तोंडणी यंत्र
मजुरांच्या टंचाईमुळे लहान ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वेळेवर मजूर न मिळणे हे सर्वात मोठे कारण आहे. मिलकडून परवानगी मिळाल्यानंतर, ऊस उत्पादक शेतकरी मजुरांचा शोध घेतात, त्यानंतर त्यांना ऊस तोडणी, सोलणे आणि लोडिंगसह निर्धारित वेळेत गिरणीत पोहोचावे लागते. अनेकवेळा असे घडते की, शेतकऱ्यांना कुटुंबासह ऊस तोडणी करावी लागते. यंत्रामुळे सर्व कामे वेळेत होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.
ऊस तोडणी यंत्रामुळे होणारे फायदे
सध्या जिथे 10 ते 15 मजुरांचा गट एका दिवसात 10-15 टन ऊसतोड करू शकतो, तिथे हेच मशीन एका तासात 15 टन ऊस तोडू शकते. शक्तीमान शुगरकेन हार्वेस्टर 3737 आणि न्यू हॉलंड शुगरकेन हार्वेस्टर ऑटोसॉफ्ट 4000 हे आज भारतातील दोन लोकप्रिय ऊस तोडणी यंत्र आहेत. त्यांची किंमत 90 ते 95 लाखांपर्यंत जाते, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी ते खरेदी करू शकत नाही, त्यासाठी सरकार कडून 40% किंवा मग 35 लाख जे किंमत कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येईल.
20 टक्के रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करावी
या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी यंत्राच्या किंमतीच्या किमान 20 टक्के रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. उर्वरीत रक्कम लाभार्थ्यांना कर्जरुपाने उभी करावी लागणार आहे. दरम्यान, या ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी अर्जदारांनी परीपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं सादर करावा असे सांगण्यात आले आहे.