आधी आयआयएफएल म्युच्युअल फंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 360 वन म्युच्युअल फंडने सोमवारी, 4 सप्टेंबरला म्हणजे आजच बॅलन्स्ड हायब्रिड फंड लाॅंच केला आहे. गुंतवणुकदारांना या स्कीमध्ये 18 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. ही ओपन एंडेड स्कीम असून, गुंतवणुकदार त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा पैसे काढू शकणार आहेत. कंपनीने दीर्घ कालीन भांडवल वाढवण्यासाठी आणि कमाई करण्याच्या उद्देशाने हा न्यू फंड ऑफर (NFO)ओपन केला आहे.
Table of contents [Show]
गुंतवणूक किती करायची?
अॅसेट मॅनेजमेट कंपनी 360 वन म्युच्युअल फंडनुसार, या बॅलन्स्ड हायब्रिड फंडमध्ये तुम्ही कमीतकमी 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. म्हणजे तुम्ही या फंडद्वारे 1000 रुपयांची एसआयपी करु शकता. तसेच, वन टाईम गुंतवणूकही या फंडद्वारे करता येणार आहे. तसेच, गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही आहे.
त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार गुंतवणूक करू शकता. याशिवाय फंडला कोणताही लाॅक इन अवधी नसल्यामुळे तुम्ही कधीही पैसे काढू शकता. मात्र, अलॉटमेंटच्या तारखेआधी पैसे काढल्यास 1 टक्का एक्झिट लोड द्यावा लागणार आहे. त्यामुळे पैसे काढताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
कंपनीचा बेंचमार्क
360 वन बॅलन्स्ड हायब्रिड फंड हा ओपन एंडेड स्कीमचा इंडेक्स फंड आहे. त्यामुळे फंडचा बेंचमार्क Nifty 50 Hybrid Composite Debt 50:50 Index आहे. यावरुन हा फंड इक्विटी आणि डेब्टमध्ये सारखीच गुंतवणूक करणार असल्याचे लक्षात येते.
इक्विटी आणि डेब्टमध्ये गुंतवणूक
360 वन बॅलन्स्ड हायब्रिड फंड गुंतवणुकदरांना सुलभतेच्या लाभासह इक्विटी आणि फिक्स्ड इनकम अॅसेट या दोन्ही ठिकाणी प्रवेश देत आहे कारण, फंड मॅनेजर्सना इक्विटी आणि डेब्ट दोन्हीसाठी 40-60 टक्क्यांच्या मर्यादेत वाटप अॅडजस्ट करता येईल. जेणेकरुन गुंतवणुकीला सध्याच्या परिस्थितीनुसार मॅनेज करता येईल, अशी कंपनीने माहिती दिली आहे.
फंडमध्ये कोण करु शकतो गुंतवणूक?
ज्यांना दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची आहे. म्हणजेच तीन वर्षाच्या वर जे थांबू शकतात त्यांच्यासाठी हा फंड खास ठरणार आहे. तसेच, ज्यांना डेब्ट आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा फंड योग्य असणार आहे. हा फंड मयुर पटेल आणि मिलन मूडी हे दोन मॅनेजर हाताळणार आहेत. मात्र, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.
ती म्हणजे ह्या फंडच्या पेपर्सनुसार हा फंड व्हेरी हाय रिस्कमध्ये येतो. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी रिस्क समजून घेऊन गुंतवणूक करणे योग्य ठरणार आहे. तसेच, स्कीमने जे उद्देश ठेवला आहे, तो पूर्ण होईल की नाही याची काही शक्यता नाही. पण, कंपनीला त्यांनी ठरवलेला उद्देश पूर्ण होण्याचा विश्वास आहे. सध्या 360 वन म्युच्युअल फंडची एकूण मालमत्ता पाहिल्यास 5334 कोटी रुपये आहे.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)