भारतीय लोकांची ओळख ही शेतीशी जोडली गेली आहे. आजही भारतातील बहुसंख्य लोकांचा उदर्निर्वाह शेतीवर चालतो. त्यामुळे शेतीला व्यवसाय या उद्देशाने पाहिले आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तर लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकरी सहज घेऊ शकतात. आजच्या घडीला शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जातायेत. शेतकरी पारंपरिक शेती सोडून आता नगदी पिकांकडे वळू लागले आहेत. आज महामनी तुम्हाला अशा एका फुलाबद्दल माहिती देणार आहे, ज्याची लागवड करून शेतकरी श्रीमंत होऊ शकतो. त्या फुलाचे नाव आहे 'जिरेनियम' (Geranium). या फुलापासून तेलाची निर्मिती केली जाते. याच्या प्रति लिटर तेलाची किंमत 20,000 रुपये असल्याने शेतकरी यातून लाखो रुपये कमवू शकतात.
Table of contents [Show]
अरोमा मिशन अंतर्गत सरकार देतंय प्रोत्साहन
देशात सुगंधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी सरकार अरोमा मिशन अंतर्गत मदत करत आहे. जिरेनियम हा सुगंधी वनस्पतीचा एक प्रकार आहे. या वनस्पतीला गरिबांचे गुलाब असेही म्हटले जाते. जिरेनियमच्या फुलांपासून तेल बनवले जाते. या तेलाचा वापर औषध बनवण्यासाठी आणि इतर कामांसाठी केला जातो. याचा सुगंध हा गुलाबाच्या (Rose) फुलासारखा असतो. ज्याचा वापर एरोमाथेरपी, सौंदर्य उत्पादने, परफ्यूम आणि सुगंधित साबणांमध्ये केला जातो. आपण वापरत असलेल्या दैनंदिन सौंदर्य प्रसाधनांमध्ये जिरेनिय वनस्पतीच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसे पाहायला गेल्यास भारतीय बाजारपेठेतील जिरेनियम तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून हे तेल आयात केले जाते.
जिरेनियम लागवडीचे तंत्र
जिरेनियम (Geranium) ही एक सुगंधी व औषधी वनस्पती असून त्याची लागवड मध्यम प्रतीच्या जमिनीवर किंवा माळरानावरही करता येते. थोडक्यात काय तर, ज्या ठिकाणी टॅक्टरने नांगरता येते, अशा कोणत्याही जमिनीत जिरॅनियमचे पीक घेता येते.
सर्वसाधारण 20 डिग्री सेल्सियस ते 34 डिग्री सेल्सियस तापमानात हे पीक चांगल्या प्रकारे वाढते. यापेक्षा जास्त तापमानात पिकांची वाढ खुंटते व पाहिजे तसे उत्पन्न मिळवता येत नाही. या पिकासाठी आद्रता 75% ते 80% दरम्यान असावी लागते.
हे पीक तीन वर्ष शेतात राहणार असल्याने शेत जमिनीची नांगरणी योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे.
नांगरणी करून जमिनीची मशागत केल्यानंतर बेड तयार करून घ्यावेत. आणि त्यावर ठिबक सिंचनाचा वापर करावा, जेणेकरून जास्त पाणी लागणार नाही. साधारण चार बाय दीड फुटावरच्या अंतरावर याच्या पिकाची लागवड करावी.
या वनस्पतीची एकदा लागवड केल्यानंतर किमान तीन वर्ष हे पीक उत्पन्न देते. एक एकर जमिनीमध्ये 10,000 हजार रोपांची लागवड केली जाते. लागवडीनंतर हे पीक चार महिन्यानंतर पहिल्यांदा कापणीला येते व त्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला पिकाची कापणी करावी लागते. थोडक्यात काय तर, हे पीक एका वर्षात तीनवेळा कापणीला येते.
इतपत मिळतो नफा
या पिकासाठी एकरी सुरुवातीचा 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खतांचा खर्च 75% हून कमी येतो.
एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला सहज मिळवता येते. याच्या एका लिटर तेलाची किंमत 20,000 रुपये आहे. या हिशोबाने एक एकर जमिनीमध्ये एका वर्षात सरासरी उत्पन्न 6 ते 8 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.
भारतात मोठ्या प्रमाणावर तेलाची मागणी
भारतात जिरेनियम फुलाच्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक वर्षाला तेलाची मागणी ही 200 ते 300 टनाची असते. मात्र सध्याच्या स्थितीत भारतात वर्षाला केवळ 10 टनाहून ही कमी ऑईल निर्मिती होत आहे. त्यामुळे ही शेती करणं शेतकऱ्यांना फायद्याचे ठरू शकते. उत्तर प्रदेशातील बदायूं, कासगंज, संभल यांसारख्या अनेक जिल्ह्यांतील शेतकरी जिरेनियम फुलशेती करतात.