New Insurance Companies: भारतामध्ये विमा क्षेत्राची वाढ झपाट्याने होत आहे. येत्या काळात 20 नव्या विमा कंपन्या बाजारामध्ये दाखल होतील, असे विमा नियामक संस्थेचे अध्यक्ष देबशीश पांडा यांनी म्हटले. या कंपन्यांना परवाने देण्याचे काम सध्या सुरू आहे. कोरोनाकाळात जीवन विमा आणि आरोग्य विम्याचे महत्त्व अधोरेखित झाले होते. त्यामुळे आता भारताच्या खेडोपाड्यातही विमा पोहचला आहे. विमा क्षेत्राची वाढ दिलासादायक असून नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तांचे संरक्षण होत आहे.
विमा क्षेत्राची वाढ
Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) चे संचालक देबशीश पांडा यांनी सांगितले की, विमा व्यवसाय सुरू करण्यास उत्सुक असणाऱ्या सुमारे 20 कंपन्यांची परवाना मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील काही दिवसांत त्यांना परवाने मिळतील. 2022-23 वर्षात तीन जनरल इन्शुरन्स कंपन्यांची स्थापना झाली होती. यामध्ये एको जनरल इन्शुरन्स, क्रेडिट अॅक्सेस आणि Kshema General Insurance या तीन कंपन्यांचा समावेश आहे. याआधी 2011 मध्ये नवी जीवन विमा कंपनी भारतात सुरू झाली होती. त्यानंतर एकही जीवन विमा कंपनी सुरू झाली नव्हती. मात्र, आता दोन कंपन्या स्पर्धेत उतरत आहेत.
10 लाख कोटी प्रिमियम जमा
इर्डाचे संचालक देबशीश पांडा म्हणाले की, "भारतीय विमा क्षेत्र परिपक्व अवस्थेत आहे. 2022-23 वर्षात विमा कंपन्यांकडे 10 लाख कोटी प्रिमियम जमा झाला. तर एकूण संपत्ती (AUM of Insurance companies) 59 लाख कोटींच्याही पुढे गेली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंतची आकडेवारी पाहता विमा क्षेत्राने 16% वाढ नोंदवली आहे". 140 कोटी नागरिकांचे आरोग्य, जीवन, मालमत्ता, व्यवसायांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आणखी विमा कंपन्यांची आवश्यकता आहे. विमा कंपन्यांमध्ये निरोगी स्पर्धा, भांडवल, पुरवठा साखळी निर्माण होण्याची गरज पांडा यांनी व्यक्त केली.
नव्या विमा योजना आणण्यावर भर
नागरिकांचे व्यवसाय आणि जीवनशैलीला योग्य असे विमा प्लॅन बाजारात आणण्याचे आवाहन त्यांनी इन्शुरन्स कंपन्यांना केले. (News Insurance Companies) तात्पुरते काम करणारे कर्मचारी (गीग वर्कर), कॅब रायडर, डिलिव्हरी करणारे. तसेच जास्त जोखमीचे काम करणाऱ्यांसाठी खास विमा पॉलिसी तयार करायला हव्यात. तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत खेडोपाडी विमा पोहचवण्यावरही त्यांनी भर दिला. इर्डाचे संचालक पांडा यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबतही बैठक घेतली. विमा कंपन्या आणखी कोणत्या नव्या क्षेत्रामध्ये उतरू शकतात. नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठीच्या नव्या कल्पना कोणत्या यावर बैठकीत चर्चा झाली.
वाहन विमा क्षेत्रात वाढीची गरज
भारतामध्ये जनरल इन्शुरन्स क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत. (vehicle Insurance) मात्र, देशातील 50% वाहने विना इन्शुरन्सची आहेत. वाहनांना कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य आहे. मात्र, तरीही अनेक वाहनचालक विमा काढत नाहीत. यावर सरकारी पातळीवर निर्णय घेण्याचीही आवश्यकता आहे. मागील काही दिवसांपूर्वी विमा कंपन्याची परिषद झाली होती. विमा नसणाऱ्या वाहनांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास नकार देण्यात यावा. त्यासाठी परिवहन विभागाची मदत घेण्यात यावी, अशी मुद्दा मांडण्यात आला होता.