केंद्र सरकारच्या तिजोरीत जीएसटीच्या (Goods and service tax) माध्यमातून मोठ्या प्रमाणात संकलन होत आहे. जून 2023 मध्ये देशभरातून जमा झालेल्या जीएसटीची आकडेवारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. जून महिन्यात तब्बल एकूण 1,61,497 कोटी रुपये GST चे संकलन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वार्षिक आधारावर 12% वाढ झाली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. तसेच जीएसटी लागू केल्यापासून (जुलै 2017) चौथ्यांदा जीएसटी संकलनामध्ये 1.60 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये 4,407 कोटीने वाढ
जून 2023 मध्ये एकत्रित GST महसूल 1,61,497 कोटी असून यामध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) 31,013 कोटी रुपये, राज्य जीएसटी(SGST) 38,292 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी (IGST) 80,292 कोटी (यामध्ये वस्तूंच्या आयातीवर 39,035कोटी रुपयांच्या कराचाही समावेश आहे) तसेच उपकराच्या माध्यमातून 11,900 कोटी रुपयांचे संकलन झाले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे. मागील मे 2023 या महिन्यात जीएसटी संकलनाचा हा आकडा 1,57,090 कोटी रुपये होता. म्हणजेच मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात 4,407 कोटी रुपये अधिक संकलन झाले आहे.
महाराष्ट्राचा जीएसटी वाटा सर्वाधिक-
जून 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा वाटा हा सर्वाधिक आहे. महाराष्ट्राने गेल्या एक वर्षात 26,O98 कोटी रुपयाचा जीएसटी केंद्राच्या तिजोरीत जमा केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा महाराष्ट्राच्या जीएसटी संकलनात 17 टक्के वाढ झाली आहे. या यादीत 11,193 कोटींच्या संकलनासह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे, तर गुजरात 10,119 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच जून महिन्यात महाराष्ट्राने एकूण 3484 कोटी रुपयांचा जीएसटी संकलित केला आहे.
जीएसटी संकलनामध्ये सातत्याने वाढ-
2021-22 या आर्थिक वर्षात सरासरी मासिक GST संकलन 1.10 लाख कोटी रुपये होते, तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ते 1.51 लाख कोटी रुपये होते आणि 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत सरासरी संकलन 1.69 लाख कोटी रुपये होते. जीएसटी संकलनात सातत्याने वाढ होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.