भारत सरकार वेगवेगळ्या निमित्ताने खास नाण्यांचे अनावरण करत असते. काल, देशाच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 75 रुपयांचे विशेष नाण्याचे लोकार्पण केले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाच्या अधिसूचनेनुसार, 75 रुपयांच्या नवीन नाण्याचे वजन अंदाजे 35 ग्रॅम इतके असेल. आता तुम्ही म्हणाल हे नाणे कोण आणि किती रुपयांत विकत घेऊ शकेल?
75 रुपयांचे नाणे जर असेल तर ते 75 रुपयांतच मिळणार का? आदी प्रश्न तुम्हांला पडले असतील. तर तुमच्या माहितीसाठी आम्ही हे सांगू इच्छितो की, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या www.indiagovtmint.in या भारत प्रतिभूती मुद्रणच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करू शकता तेही 75 रुपयांत.
परंतु, भारत प्रतिभूती मुद्रणच्या वेबसाईटवर अशी काही विशेष नाणी आहेत ज्यांच्या किंमती प्रत्यक्ष चलनापेक्षा अधिक आहे. चला तर जाणून घेऊया अशाच काही किंमती नाण्यांबद्दल.
होमी भाभा यांच्या स्मरणार्थ असलेले नाणे
ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 2009 साली भारत सरकारने एक नाणे लॉन्च केले होते. भारतीय मिंटच्या (टांकसाळ विभागाच्या) अधिकृत वेबसाईटवर सगळ्यात महाग कुणाच्या स्मरणार्थ लॉन्च केलेले नाणे विकले जात असेल तर ते आहे डॉ. होमी भाभा यांच्या स्मरणार्थ असलेले 100 रुपयांचे नाणे. वेबसाईटवर या नाण्याची किंमत 18,561 रुपये इतकी आहे.
कुका चळवळीची 150 वर्षे
बाबा राम सिंह यांनी सुरू केलेल्या कुका चळवळीच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ भारत सरकारने 100 रुपयांचे विशेष नाणे जारी केले होते. ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेविरोधात पंजाबमध्ये झालेले पहिले बंड म्हणून या कुका चळवळीला ओळखले जाते. या चळवळीत सामील झालेल्या योद्ध्यांचा सन्मान म्हणून भारत सरकारने जारी केलेल्या 100 रुपयांच्या नाण्याची किंमत किंमत 10,735 रुपये इतकी आहे.
मोतीलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ असलेले नाणे
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदाने देणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिक मोतीलाल नेहरू यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2012 साली भारत सरकारने एक विशेष नाणे लॉन्च केले होते. 150 रुपयांच्या नाण्याची किंमत 8678 रुपये इतकी आहे.
एवढेच नाही तर श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी देवस्थानाच्या गौरवार्थ 2015 साली जारी करण्यात आलेल्या 1000 रुपयाच्या नाण्याची किंमत 7132 रुपये इतकी आहे. तर आचार्य तुलसी जन्म शताब्दी निमित्त जारी केलेल्या 20 रुपयांच्या नाण्याची किंमत 7905 रुपये इतकी तर म्हैसूर विद्यापीठाच्या 100 व्या वर्धापन दिनाच्या निमित्त जारी केलेल्या 10 आणि 5 रुपयांच्या नाण्याची एकत्रित किंमत 8087 रुपये इतकी आहे.
भारतीय टांकसाळीच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.indiagovtmint.in/ जाऊन तुम्हांला जे नाणे खरेदी करायचे आहे ते तुम्ही कार्टमध्ये जोडू शकता आणि आवश्यक ती माहिती आणि ऑनलाईन पेमेंटद्वारे तुम्ही नाणे खरेदी करू शकता.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            