Rules Regarding NRI Landlord : अनेक अनिवासी भारतीय मोठमोठ्या शहरांमध्ये आणि विशेष म्हणजे जिथे आयटी हब असेल अश्या शहरांमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूक केलेल्या मालमत्तेचे मूल्य वाढले की, ती विकणे किंवा भाड्याने देऊन उत्पन्न मिळविणे, हा त्यामागील उद्देश असतो. आणि जर तुम्ही NRI कडून निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता भाड्याने घेतली असेल, तर त्याच्या भाड्याच्या पैश्यांवर TDS (Tax Deducted at Source) नियम लागू होईल. आणि भाडेकरुला दर महिन्याला भाड्याच्या रकमेवर टीडीएस कापावा लागेल. हा कर तुम्हाला आयकर विभागाकडे जमा करावा लागेल. असे न केल्यास भाडेकरुला आयकर विभागाकडे प्रचंड व्याज आणि दंड भरावा लागतो. त्यामुळे तुम्ही जर का एनआरआयकडून म्हणजेच अनिवासी भारतीयाकडून घर भाड्याने घेतले असेल, तर तुम्हाला टीडीएस कापण्याचा नियम पाळावा लागेल. संबंधित नियम निवासी आणि व्यावसायिक अश्या दोन्ही मालमत्तांसाठी लागू होतो.
एनआरआय (NRI) म्हणजे काय?
एनआरआय हा एक भारतीय नागरिक आहे, परंतु व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे मागील आर्थिक वर्षाच्या अर्ध्यापेक्षा जास्त काळापासून तो भारताबाहेर राहत आहे, असा व्यक्ती होय. NRI ही व्यक्ती भारतीय वंशाची व्यक्ती किंवा भारताची नागरिक असू शकते. परंतु आयकर कायद्याच्या उद्देशाने तो भारताचा रहिवासी असू शकत नाही. आयकर कायदा, कलम 6 एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीशी संबंधित आहे.
NRI मालमत्तेसाठी TDS ची तरतूद काय?
भाडेकरुला आयकर विभागाकडून कर कपात आणि संकलन खाते क्रमांक (TAN) घेणे आवश्यक आहे. यासाठी त्याला TIN-PAN सुविधा केंद्रावर फॉर्म 49B ऑनलाइन किंवा ऑफलाइन सबमिट करावा लागेल. ही प्रक्रिया केवळ एकदाच करावी लागते. जर का भाडेकरुकडे आधीचाच TAN (Tax Deduction and Collection Account Number) क्रमांक असेल, तर तो त्याला पुन्हा घेण्याची गरज नसते.
TDS किती कापला जातो?
भाड्याच्या रकमेवर 31.2 टक्के दराने म्हणजेच (30 टक्के प्राप्तिकर आणि 4 टक्के उपकर) असा TDS कापल्या जातो. ही रक्कम आयकर विभागाकडे पॅन वापरुन जमा करावी लागते. तसेच ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर TDNs 281 फॉर्म भरुन रक्कम जमा करता येते. TDS दर महिन्याला भरणे आवश्यक आहे. फॉर्म 27Q मध्ये TDS रिटर्न TDS भरण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन सबमिट करणे आवश्यक आहे.