मधल्या काळात एक खान्देशी गाणं आलं होत. ‘फुगे घ्या फुगे… केसावर फुगे’, हे गाणं ऐकल्यावर सर्वसामान्य माणसाला वाटेल हे काय गाणं आहे. केस कोण जमा करतं. पण केस जमा करणं आणि विकणं हा खूप मोठा उद्योग आहे. नेहमी केस विंचरताना खाली पडलेले केस आपण टाकून देतो. पण हे खाली पडलेले केस खराब नसतात, याच केसांच्या माध्यमातून आपण कोटी रूपयांचा व्यवसाय करू शकतो. भारतातदेखील केसांचा व्यवसाय लोकप्रिय आहे. हे केस जास्त किमतीत विकले जातात. तुमचे केस फक्त 100 किंवा 200 प्रति किलो रूपयाने विकले जात नसून त्या केसांची किंमत हजारो रूपये प्रति किलो ऐवढी असते.
भारताचा या व्यापारातील सहभाग
जगभरात या व्यापारात भारताचा वाटा 80 टक्के आहे. भारतातून दरवर्षी 1300 टन केस निर्यात होतात. ज्या देशांत केसांपासून विग किंवा गंगावन यासारखी उत्पादने तयार केली जातात, अशा देशांतल्या सुमारे 200 उत्पादकांना भारतातून केस निर्यात केले जातात. जगातल्या केसांच्या व्यापारात भारत आघाडीवर तर आहेच; पण या व्यापाराचे केंद्र चेन्नईत आहे. या व्यापारात दरवर्षी 10 ते 30 टक्के वाढ होत असते.
व्यापाऱ्यांना केस कुठून मिळतात
पुरुषांच्या लहानमोठ्या सलूनमध्ये मोठया प्रमाणात नागरिक दर महिन्याला केस कापत असतात. अशा सलूनमधून मोठ्या प्रमाणात केस जमा केले जातात. तसेच, महिलांच्या ब्युटीपार्लर मध्येही महिलांचे केस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. श्रीमंत लोकही मोठ्या सलूनमध्ये केस कापतात. त्यांचे केस दर्जात्मक असतात. सॉफ्ट असतात. काही महिला व पुरुष अशा सलूनमध्ये जाऊन केस गोळा करीत फिरत असतात. ग्रामीण भागात आजही काही महिला दररोज केस विंचरताना कंगव्यात अडकलेले केस बाजूला काढून त्यांचा गोळा करून ती वेगळी जमा करून ठेवतात. काही दिवसांनी ते केस विकले जातात किंवा त्याबद्ल्यात वस्तू घेतली जाते. केसांच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर त्याचं मूल्य ठरतं. त्यानसार मग एखादं भांडे, मुलांसाठी खेळणी, फुगे, गृहोपयोगी वस्तू दिल्या जातात. शेवटी ह्या केसांची खरेदी मोठ्या व्यापारांकडून केली जाते.
कोणत्या केसांना जास्त मागणी असते
अनेक जण केस गळतात म्हणून किंवा केस चांगले रहावेत म्हणून केसांवर अनेक प्रयोग करत असतात. असे प्रयोग केलेल्या केसांचे मूल्य कमी असते. या व्यापारात लांब आणि उपचार न केलेल्या केसांना जास्त मागणी आहे. केसांच्या दर्जानुसार व त्यांच्या लांबीनुसार त्याची किंमत ठरते. किमान 8 ते 12 इंची केसांना चांगला दर दिला जातो. कमी लांबीच्या केसांना कमी दर दिला जातो.
तिरुपती देवस्थानाकडून केसांचा लिलाव
दक्षिण भारतातील सर्वात मोठे श्रीमंत धार्मिक स्थळ म्हणजे 'तिरुपती बालाजी'. याठिकाणी भाविक श्रद्धेचा भाग म्हणून आपले केस दान करतात. दररोज 500 किलो केस या तिरुपती बालाजी मंदिराच्या ठिकाणी जमा होत असल्याचे समजते. या ठिकाणी जमा होणारे केस पुढे लिलावात विकले जातात. जो त्या केसांना जास्तीत जास्त किंमत देतो त्याला ते केस विकण्यात येतात. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात केस जमा होतात. या केसांपासून मंदिर प्रशासनाला मोठी कमाई होते. या मंदिरात दर्शनाला गेलं की देवाला डोक्यावरचे केस अर्पण करण्याची प्रथा आहे. यंदा मंदिराला केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज आहे.
केसांना कोट्यवधी रुपयांची किंमत!
देश-विदेशात महिला व पुरुषांच्या केसांची खूप मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर केसांची खूप मोठी बाजारपेठ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात केसांची किंमत खूपच जास्त आहे. साधारणतः या केसांची किंमत पाहता एक किलो केसांची किंमत 3 लाख 60 हजार रुपये, 100 ग्रॅम केसांची किंमत 36 हजार रुपये तर 10 ग्रॅम केसांची किंमत 3 हजार 600 रुपये इतकी असते.
केसाचे वर्गीकरण आणि साठवणूक कशी करतात
जमा केलेले केस स्वच्छ धुवून व त्यावर रासायनिक फवारणी करून त्यांची छाटणी करतात. त्यानंतर हे केस दर्जानुसार व लहान-मोठी साईज बघून वेगळे ठेवण्यात येतात. पुढे त्या केसांची देश, विदेशात विक्री करण्यात येते. त्यामधून कोट्यवधी रुपयांची कमाई संबंधित व्यापाऱ्यांना होत असते.
केसांपासून कोणती उत्पादने तयार करतात
• केस प्रत्यारोपण
• कृत्रिम विग
• कृत्रिम दाढी-मिशी
• अंबाडा, गंगावन
व्यापार जगतात कोट्यवधी रुपयांची मिळकत करून देणाऱ्या या व्यवसायाचा सर्वसामान्यांनी कधी विचार केला असेल का.